मुंबई/नाशिक (pragatbharat.com) : नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली होती. अनेक महिलांची फसवणूक करणाऱ्या या भोंदू बाबाच्या काळ्या कारनाम्यांवर आता थेट रूपेरी पडद्यावर ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ (Maharashtra Epstein Files) नावाचा चित्रपट येत आहे. दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार वाद पेटला आहे.
किरीट सोमय्यांचे नाव घेत सुषमा अंधारेंचा टोला: या चित्रपटात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दीपाली सय्यद दिसणार आहेत. मात्र, मुख्य खलनायक असणाऱ्या अशोक खरातची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या धडाडीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. “मुलुंडचे एचडी व्हिडीओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांना अशोक खरातची भूमिका मिळते का? हे बघणं जरा औत्सुक्याचं ठरेल,” अशा शब्दांत अंधारेंनी सोमय्यांवर बोचरी टीका केली आहे.
दीपाली सय्यद यांना मिळणाऱ्या धमक्यांचा निषेध: यावेळी सुषमा अंधारे यांनी अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे समर्थन केले. “दीपाली सय्यद या मुळात एक कलाकार आहेत. त्यामुळे त्यांनी कोणत्या चित्रपटात काम करावे याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. केवळ एका विशिष्ट भूमिकेसाठी किंवा सिनेमात काम करतात म्हणून त्यांना धमक्या देणे अत्यंत चुकीचे असून आपण याचा तीव्र निषेध करतो,” असे अंधारे म्हणाल्या. अशोक खरात प्रकरणाशी राजकीय नेत्यांची नावे जोडली गेल्यामुळे आधीच राजकारण तापले होते, आता या चित्रपटामुळे आणि अंधारेंच्या विधानामुळे हा वाद आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.


