
मुंबई (pragatbharat.com) : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा मानला जाणारा आणि कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोला याला मुंबई गुन्हे शाखेने अखेर ताब्यात घेतले आहे. २०२४ मधील सांगली येथील २५३ कोटी रुपयांच्या मेफेड्रोन (MD) ड्रग्ज निर्मिती आणि तस्करी प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष एनडीपीएस (NDPS) न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आर्थर रोड कारागृहातून डोलाची कोठडी गुन्हे शाखेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
सांगली ड्रग्ज फॅक्टरी कनेक्शन: मार्च २०२४ मध्ये पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील एका अवैध ड्रग्ज कारखान्यावर धाड टाकली होती. या कारवाईत १२२ किलो एमडी ड्रग्ज, रोकड आणि सोने असा एकूण २५३ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तपासादरम्यान असे समोर आले की, या अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणारा अर्थपुरवठा आणि आंतरराष्ट्रीय वितरण जाळे हाताळण्यात सलीम डोलाची भूमिका महत्त्वाची होती. या रॅकेटचे धागेदोरे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाबाहेरही पसरलेले आहेत.
इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस: ५९ वर्षीय सलीम डोला गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. त्याच्याविरुद्ध मार्च २०२४ मध्ये इंटरपोलने ‘रेड कॉर्नर नोटीस’ जारी केली होती. डोलावर गेल्या दोन दशकांपासून हेरॉईन, चरस आणि मेफेड्रोन तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात एटीएसलाही तो अनेक प्रकरणांत हवा होता. काही महिन्यांपूर्वीच दुबईतून प्रत्यार्पण केलेल्या ताहेर डोला आणि कुब्बावाला यांच्या चौकशीतून सलीम डोलाचे नाव प्रकर्षाने समोर आले होते.
आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त होणार? मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ७ कडून आता डोलाची कसून चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून ड्रग्ज तस्करीचा आर्थिक व्यवहार (Financial Trail), परदेशातील कनेक्शन आणि संघटित गुन्हेगारी सिंडिकेटची माहिती मिळण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना मोठे यश मिळण्याची चिन्हे आहेत.

