
मिरा-भाईंदर (pragatbharat.com) : मिरा-भाईंदर गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केलेल्या कोट्यवधींच्या एमडी (MD) ड्रग्ज रॅकेटमध्ये आता धक्कादायक खुलासे झाले आहेत. फार्महाऊस मालक वसीम शेख उर्फ ‘वसीम मांडप’ याचे नाव या प्रकरणात अधिकृतपणे एफआयआरमध्ये (FIR) समाविष्ट करण्यात आले आहे. आरोपींच्या चौकशीतून वसीमचा या काळ्या व्यवसायातील सक्रिय सहभाग समोर आला असून, तो सध्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लग्नाच्या हॉलमध्ये ड्रग्जचा साठा: तपासादरम्यान गुन्हे शाखेला धक्कादायक माहिती मिळाली आहे. मालवणीतील सामन नगर येथील वसीमच्या मालकीच्या एका लग्नाच्या हॉलमधील गोदामात एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारे रसायन आणि कच्चा माल लपवून ठेवल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे तर, मनोरी येथील त्याच्या फार्महाऊसवर चक्क सिंथेटिक ड्रग्ज बनवण्याची प्रयोगशाळा (Lab) कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या कारवाईत आतापर्यंत २५५ लिटर रसायने आणि १३ कोटी रुपये किमतीचे ६ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
आरोपी वसीम फरार, पोलिसांचा शोध सुरू: गुन्हे शाखेने वसीमला चौकशीसाठी समन्स बजावले होते, मात्र त्याने तपासात सहकार्य न करता पळ काढला आहे. त्याचा मोबाईल फोन सध्या बंद असून त्याने घर सोडले आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि उपायुक्त संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ४ चे पथक वसीमचा शोध घेत आहे. मंगळवारी पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी झडती घेतली, मात्र तिथे टाळे असल्याचे दिसून आले.
१३ आरोपी आधीच गजाआड: या प्रकरणात आतापर्यंत मुंबई, ठाणे आणि गुजरात येथून १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ‘वसीम मांडप’ याच्या अटकेनंतर या रॅकेटचे आंतरराज्य कनेक्शन आणि मुख्य सूत्रधारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखेने आता वसीमच्या मालमत्ता आणि बँक व्यवहारांची तपासणी सुरू केली असून, लवकरच त्याला बेड्या ठोकल्या जातील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

