नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई: आंतरराज्य ‘इराणी गँग’ जेरबंद; १२.७५ लाखांचे दागिने जप्त, १० गुन्हे उघड

नवी मुंबई (pragatbharat.com) : साखळी चोरीच्या घटनांनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी नवी मुंबई पोलिसांनी एक दिलासादायक बातमी दिली आहे. अनेक राज्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात ‘इराणी गँग’च्या तीन सदस्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी १२.७५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, दोन मोटारसायकली आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. या अटकेमुळे साखळी चोरीच्या १० प्रकरणांचा उलगडा झाला आहे.

ऐरोलीतील घटनेने सुरू झाला तपास: १९ एप्रिल रोजी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४१ वर्षीय महिलेची १० ग्रॅमची सोन्याची साखळी चोरट्यांनी पळवली होती. या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली. ऐरोली ते कल्याणपर्यंतच्या शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला. अखेर कल्याणमधील अंबिवली येथील इराणी वस्तीतून तीन आरोपींना अटक करण्यात आली.

अटक केलेले आरोपी आणि गुन्हेगारी रेकॉर्ड: अटक केलेल्या आरोपींची नावे अब्बास सल्लू जाफरी उर्फ इराणी सय्यद (२९), हुसैनी फैयाज सय्यद (४५) आणि जाफर अब्बास अश्रफ सय्यद (३६) अशी आहेत. हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका आरोपीवर चक्क २५ तर दुसऱ्यावर २४ गुन्हे नोंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अशा करायचे चोऱ्या: ही टोळी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी किंवा निर्जन ठिकाणी महिलांना लक्ष्य करत असे. तपासात आरोपींनी रबाळे आणि कापूरबावडी पोलीस ठाण्यांतर्गत १० गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ८५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले असून, या टोळीचे आणखी काही सदस्य आणि चोरलेला माल मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. या कारवाईमुळे आंतरराज्य साखळी चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *