अशोक खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकर यांना ‘ईडी’चे समन्स; २.४० कोटींच्या संशयास्पद व्यवहाराची आता मुंबईत चौकशी

शिर्डी/मुंबई (pragatbharat.com) : नाशिकचा वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण आता अधिक गडद झाले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले आहे. मुंबईतील झोन २ च्या ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२ कोटी ४० लाखांची संशयास्पद उलाढाल: पोलीस तपासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहाता येथील समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या पुतण्याच्या नावाने चार खाती उघडण्यात आली होती. या खात्यांमधून तब्बल २ कोटी ४० लाख रुपयांची मोठी उलाढाल झाली आहे. विशेष म्हणजे, या सर्व खात्यांवर अशोक खरात हा ‘नॉमिनी’ म्हणून नोंदवलेला होता. या आर्थिक व्यवहारांचा मूळ स्रोत काय आणि भोंदू खरातशी त्यांचे नेमके काय संबंध आहेत, याचा छडा आता ईडी लावणार आहे.

बनावट खात्यांचा दावा आणि पोलीस चौकशी: यापूर्वी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांची सुमारे ८ तास कसून चौकशी केली होती. त्यावेळी प्रतिभा चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. आपल्या नावाने बनावट सह्या करून ही खाती उघडण्यात आली असून, या व्यवहारांशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, खात्यांमधील व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याने आता केंद्रीय यंत्रणा या प्रकरणाचा ताबा घेताना दिसत आहे.

राजकीय पडसाद: भोंदू खरात प्रकरणामुळे यापूर्वीच रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांच्या कुटुंबातील सदस्याला थेट ईडीने समन्स बजावल्याने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या चौकशीतून लवकरच मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *