
मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना (ठाकरे गट) मध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. उद्धव ठाकरे रिंगणात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाल्यावर पक्षाने अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली. मात्र, या प्रक्रियेत चर्चेत असलेल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना उमेदवारी न मिळाल्याने विरोधकांनी त्यांना सोशल मीडियावर लक्ष्य केले आहे. भाजपशी संबंधित एका कार्यकर्त्याने अंधारे यांचे एक व्यंगचित्र पोस्ट केल्यानंतर, अंधारे यांनी आपल्या खास शैलीत ‘राजकीय बापा’वरून विरोधकांचा घणाघाती समाचार घेतला आहे.
“आम्ही हट्ट फक्त कुटुंबप्रमुखाकडेच करतो!” ट्रोलर्सना उत्तर देताना सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहिली आहे. त्या म्हणतात, “दोन दिवसांच्या ट्रॉलिंगमध्ये हे व्यंगचित्र सर्वात दर्जेदार आहे. भाजपच्या कामगार सेनेच्या एका कार्यकर्त्याने हे शेअर केले असून, पोटापाण्यासाठी तो हे करत असल्याने त्याला माफ करा. या चित्रात मी सन्मानाने पक्षप्रमुखांकडे हट्ट धरते आहे, हे पाहून मला आनंद झाला. घरातील मुले आपल्या कुटुंबप्रमुखाकडेच हट्ट करतात, शेजाऱ्याला जाऊन बाप म्हणत नाहीत. आणि बापाने हट्ट पुरवला नाही, तरी आम्ही दारोदार नवा बाप शोधत नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
नेत्यांच्या बदलत्या निष्ठेवर डागली तोफ अंधारे यांनी या पोस्टच्या माध्यमातून राज्यातील बड्या नेत्यांच्या बदलत्या भूमिकांवर नावशिनिशी टीका केली आहे.
- गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत: “निवडणुकीत बिरोबाची शपथ घेऊन भाजपला मतदान करू नका म्हणणारे आता भाजपसाठी काहीही करायला तयार आहेत. राजू शेट्टींना भाऊ म्हणणाऱ्यांच्या भूमिका आता बदलल्या आहेत.”
- नारायण राणे: “राणेंना आधी बाळासाहेब ठाकरे बाप वाटायचे, मग सोनिया गांधी कुलदैवत झाल्या आणि आता ते नागपूरच्या आसरा म्हसोबाला पुजतात. त्यांच्या दोन्ही मुलांनी दोन वेगळे बाप निवडले आहेत.”
- अशोक चव्हाण आणि अजित पवार गट: “अशोक चव्हाणांचे सर्वस्व काँग्रेस होते, पण ईडीच्या (ED) दप्तराने त्यांचे गोत्र बदलले. तर छगन भुजबळ, मुश्रीफ, तटकरे यांनी आपला राजकीय बाप थकलाय असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्या ‘फॅमिली ट्री’शी नाते जोडले,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
निष्ठा हीच ओळख! या टीकेत त्यांनी प्रज्ञा सातव, महादेव जानकर, बच्चू कडू आणि चित्रा वाघ यांचाही उल्लेख केला. “ज्यांच्यासाठी आम्ही काँग्रेसचे वैर घेतले, त्या चंद्रहार पाटलांना अचानक त्यांचा बाप बदलल्याची जाणीव झाली,” असे म्हणत त्यांनी सांगलीच्या प्रकरणावरही भाष्य केले. “या व्यंगचित्रात मी माझ्या कुटुंबप्रमुखासोबत (उद्धव ठाकरे) आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे,” असे सांगत त्यांनी आपली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. अंधारे यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

