
मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ चा (IPL 2026) थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, नुकत्याच झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झालेल्या सनरायझर्स हैदराबादचे (SRH) या हंगामातील आव्हान संपुष्टात आले आहे. यंदाच्या हंगामात हैदराबादने अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली, ज्यामध्ये बिहारच्या साकिब हुसेन या युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, सध्या साकिब हुसेन आणि भारताचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन यांच्यातील एका खास नात्याची आणि संघर्षाची गोष्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे.
शूजसाठी आईने विकले होते स्वतःचे दागिने साकिब हुसेनने अत्यंत प्रतिकूल आणि गरिबीच्या परिस्थितीतून पुढे येत क्रिकेट विश्वात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) त्याला संघात घेतले होते, मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती. त्यावेळच्या एका मुलाखतीत साकिबने आपल्या संघर्षाचा काळ आठवताना सांगितले होते की, क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक असलेले ‘स्पाइक शूज’ खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. बाजारात या शूजची किंमत १० ते १२ हजार रुपये होती. आपल्या मुलाचे स्वप्न तुटू नये म्हणून साकिबच्या आईने स्वतःचे सोन्याचे दागिने विकून त्याला ते शूज विकत घेऊन दिले होते.
“ईशान भैय्याने मला ६ जोड्या शूज भेट दिल्या!” यंदाच्या आयपीएल हंगामात साकिबने आपल्या संघर्षावर मात करत एक मोठा खुलासा केला. तो म्हणाला, “सध्या माझ्याकडे स्पाइक शूजच्या तब्बल ६ जोड्या आहेत आणि या सर्व शूज मला इशान किशन भैय्याने मिळवून दिल्या आहेत. इशान भैय्याने मला स्वतः विचारले की तुला कोणते शूज घालायला आवडतात? मी ‘अॅडिडास अॅडीपॉवर’ (Adidas Adipower) असे सांगताच, भैय्याने मोठ्या भावासारखे मला त्या शूजच्या ६ जोड्या भेट म्हणून दिल्या.” इशान किशनने दाखवलेल्या या दातृत्वाचे क्रिकेट विश्वात कौतुक होत आहे.
टीकाकारांना शब्दाने नव्हे, तर कृतीने दिले उत्तर साकिब हुसेनला सनरायझर्स हैदराबादने ३० लाख रुपयांच्या बेस प्राईजवर खरेदी केले होते. सिनियर खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतर १३ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच सामन्यात २४ धावांत ४ बळी घेत इतिहास रचला. या हंगामात ११ सामन्यात त्याने १५ विकेट्स घेत पॉवरप्लेमध्ये आपली छाप पाडली. साकिबने मुलाखतीत सांगितले की, “मी जेव्हा क्रिकेट खेळायला लागलो, तेव्हा लोक म्हणायचे की लाखो लोक खेळतात, तू कधीच मोठ्या स्तरावर खेळू शकणार नाहीस. मी त्यांना शब्दाने नाही, तर माझ्या कृतीने उत्तर देण्याचे ठरवले होते आणि आज मी ते करून दाखवले.”


