
मुंबई (pragatbharat.com) : पश्चिम बंगालमधील निवडणुकांच्या निकालांनंतर भारतीय जनता पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयाचे वर्णन ‘महापरिवर्तन ऐतिहासिक’ असे केले आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांच्या ‘बाहेरचे’ असण्याच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.
फडणवीस म्हणाले की, “ज्यांनी आम्हाला बंगालमध्ये बाहेरचे म्हटले, त्यांना हे ठाऊक असायला हवे की ज्यांनी भारतीय जनता पक्षाची (तत्कालीन जनसंघ) निर्मिती केली, ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्वतः बंगालचे सुपुत्र होते. त्यामुळे तांत्रिक आणि वैचारिकदृष्ट्या भाजप हाच बंगालचा खरा पक्ष आहे.” आजचा हा विजयी दिवस लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, बंगालच्या जनतेने परिवर्तनाच्या बाजूने कौल दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. आगामी काळात या विजयाचे पडसाद राष्ट्रीय राजकारणावरही उमटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपच्या वतीने विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला असून, फडणवीस यांनी हा विजय बंगालच्या अस्मितेचा आणि विकासाचा विजय असल्याचे म्हटले आहे.

