आळंदीत खळबळ! राष्ट्रवादी प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक आणि हल्ला; संग्राम भंडारे यांच्यासह १०-१५ जणांवर आरोप

आळंदी (pragatbharat.com) : तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करून हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या १० ते १५ साथीदारांनी लवांडे यांना निर्जनस्थळी गाठून त्यांच्यावर शाई ओतली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे नेमका घटनाक्रम? विकास लवांडे हे आळंदी येथे एका दशक्रियेच्या कार्यक्रमासाठी प्रवचनासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून पुण्याच्या दिशेने परतत असताना, संग्राम भंडारे आणि त्यांच्या दोन-तीन गाड्यांमधून आलेल्या गोरक्षकांनी लवांडे यांची गाडी अडवली. लवांडे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओनुसार, या गुंडांनी त्यांना गाडीतून खाली ओढले, अंगावर शाईच्या बाटल्या रिकाम्या केल्या आणि धक्काबुक्की केली. धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोरांपैकी दोघांकडे बंदुका होत्या आणि त्यांनी लवांडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे.

वारकरी संप्रदायातील ‘घुसखोरी’चा वाद या हल्ल्यामागे गेल्या काही दिवसांपासून वारकरी संप्रदायात सुरू असलेला ‘घुसखोरी’चा वाद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. वारकरी चळवळीत कट्टर हिंदुत्ववादी आणि मनुवादी वृत्ती शिरल्याचा आरोप विकास लवांडे यांनी पुराव्यांसह केला होता. याच रागातून हा ‘भ्याड हल्ला’ झाल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त करत, “ज्ञानोबा-तुकोबांनाही अशाच वृत्तीने छळले होते, आम्ही या हल्ल्यांना भीक घालणार नाही,” असे म्हटले आहे.

कारवाईसाठी लवांडे यांचा सत्याग्रह या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. “जोपर्यंत संग्राम भंडारे आणि त्यांच्या गुंड साथीदारांना अटक होत नाही, तोपर्यंत माझा सत्याग्रह सुरूच राहील,” अशी आक्रमक भूमिका लवांडे यांनी घेतली आहे. राज्य सरकारने लवांडे यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणीही आता जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *