एकनाथ शिंदेंची नवीन राजकीय चाल! ‘प्रहार’नंतर आता बविआ शिवसेनेत विलीन होणार? रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

ठाणे (pragatbharat.com) : आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे-पालघर पट्ट्यात अत्यंत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षविस्तार आणि पक्षबांधणी भक्कम करण्यासाठी एक नवीन आणि मोठी राजकीय चाल खेळली आहे. बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ पक्षापाठोपाठ आता हितेंद्र ठाकूर यांचा ‘बहुजन विकास आघाडी’ (बविआ) हा पक्षदेखील शिवसेनेत विलीन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे नेते रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होऊ शकतो.

वसई-विरार पट्ट्यात ताकद वाढवण्याचा प्रयत्न: वसई, विरार, नालासोपारा आणि पालघर या पट्ट्यात बहुजन विकास आघाडीची मोठी ताकद आहे. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपने या भागात मुसंडी मारल्यामुळे बविआसमोर राजकीय अस्तित्वाचे आव्हान निर्माण झाले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांचा भाजप उमेदवाराकडून पराभव झाला होता. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही पक्षांनी एकत्र आल्यास ठाणे-पालघर भागात महायुतीची आणि पर्यायाने शिवसेनेची ताकद प्रचंड वाढणार आहे.

रवींद्र फाटक यांच्या जागेवर क्षितिज ठाकूर? या राजकीय तडजोडीमुळे ठाणे-पालघर विधान परिषद जागेवर हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असू शकतात. मात्र, यासाठी एकनाथ शिंदे यांना त्यांचे खंदे समर्थक रवींद्र फाटक यांची समजूत काढावी लागणार आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर फाटक हे सातत्याने शिंदेंच्या पाठीशी उभे राहिले आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदेंने अशाच प्रकारे जागावाटपात तडजोड करून बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाला आपल्यासोबत जोडले होते, आता तोच पॅटर्न ठाणे-पालघरमध्ये राबवला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *