किरेन रिजीजू यांचा विरोधकांवर हल्लाबोल! निवडणूक आयोग, ईव्हीएमनंतर आता न्यायपालिकेला लक्ष्य केल्याचा आरोप; आणीबाणीची करून दिली आठवण

नवी दिल्ली (pragatbharat.com) : केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते किरेन रिजीजू यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. सर्व विरोधी पक्षांनी सातत्याने सरकारी यंत्रणा, निवडणूक आयोग, ईव्हीएम (EVM) आणि प्रसारमाध्यमांवर हल्ले केले असून, आता ते न्यायपालिकेला (Judiciary) लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोप रिजीजू यांनी केला आहे. समाज माध्यमांवरील एका पोस्टद्वारे त्यांनी विरोधकांच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

रिजीजू यांनी म्हटले आहे की, “विरोधी पक्षांना हे समजत नाहीये की, अशा प्रकारे संस्थांवर अविश्वास दाखवून ते देशाच्या लोकशाहीच्या गाभ्यावरच हल्ला करत आहेत.” यावेळी त्यांनी १९७५ मध्ये काँग्रेसच्या काळात लादण्यात आलेल्या आणीबाणीची आठवण करून दिली. काँग्रेसच्या राजवटीत उच्च घटनात्मक पदे आणि तपास यंत्रणांच्या प्रमुखांच्या नियुक्त्या थेट सरकारकडून केल्या जात होत्या, मात्र सध्याच्या पारदर्शक व्यवस्थेत या नियुक्त्या एका समितीमार्फत केल्या जातात, असा दावाही त्यांनी केला.

देशातील जनता काँग्रेस पक्षाचे वास्तव जाणून आहे आणि येत्या काळात त्यांना चोख प्रत्युत्तर देऊन जन्मभराचा धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकशाही संस्थांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींना जनता कधीही माफ करणार नाही, असेही रिजीजू यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *