
पुणे (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असतानाच, कोकण विधानपरिषद जागेवरून महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुलाच्या उमेदवारीसाठी तटकरेंची मोर्चेबांधणी: कोकण विधानपरिषदेची ही जागा सध्याचे आमदार अनिकेत तटकरे यांनाच पुन्हा मिळावी, यासाठी सुनील तटकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत अनिकेत तटकरे यांनी लिहिले, “विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी साहेबांचे मार्गदर्शन लाभले तसेच आगामी वाटचालीसाठी त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले.” या भेटीदरम्यान तटकरे पिता-पुत्रांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून जाणारे होते.
शिवसेनेचा आक्रमक पवित्रा आणि गोगावलेंचा दावा: दुसरीकडे, शिवसेना मात्र ही जागा लढवण्यावर ठाम आहे. शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या माध्यमातून या जागेवर दावा ठोकण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर ही जागा नक्की कोणाच्या पदरात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“राष्ट्रवादीला कदापि जागा देणार नाही” – आमदार महेंद्र दळवी या संपूर्ण वादावर शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “पूर्वीपासून कोकण हा शिवसेनेचा कणा राहिलेला आहे. त्यामुळे आम्ही ही जागा राष्ट्रवादीला का द्यावी? काहीही झाले तरी शिवसेना ही जागा लढवणार आणि जिंकणारच,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, “एकवेळ आम्ही भाजपचा विचार करू, मात्र राष्ट्रवादीला कदापि ही जागा देणार नाही. पालकमंत्री पदही तुम्हाला आणि विधानपरिषदही तुम्हाला, असे कधीच होणार नाही.”
तटकरे आणि शिंदे यांच्या या महत्त्वाच्या भेटीमुळे आता भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांचा विरोध मावळणार की महायुतीत या जागेवरून मोठा बिघाड होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


