क्षयरोग निर्मूलनासाठी राज्यपालांचा मोठा पुढाकार; मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राबवणार ‘टीबी मुक्त भारत’ अभियान

मुंबई (pragatbharat.com) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या देशातून क्षयरोग (TB) निर्मूलनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी एक महत्त्वाचा संकल्प व्यक्त केला आहे. मुंबईतील प्रत्येक झोपडपट्टीपर्यंत ‘टीबी मुक्त भारत अभियान’ प्रभावीपणे पोहोचवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून, यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचे औचित्य साधून राजभवन येथील लोकभवन येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते ‘टीबी मुक्त भारत – लोकभवन महाराष्ट्र उपक्रम’ या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, मुंबईसारख्या महानगरात दाट लोकवस्तीच्या झोपडपट्ट्यांमध्ये क्षयरोगाचा प्रसार रोखणे हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा आणि जनजागृती पोहोचवणे ही काळाची गरज आहे.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या उपक्रमाबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, हा उपक्रम थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. विशेषतः ज्या भागात क्षयरोगाचे प्रमाण अधिक आहे, अशा झोपडपट्टी परिसरांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या अभियानांतर्गत रुग्णांना वेळेवर उपचार, पोषण आहार आणि सामाजिक पाठबळ मिळवून देण्यासाठी राजभवन प्रशासनाकडून पुढाकार घेतला जात आहे. या निर्णयामुळे मुंबईतील आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार असून क्षयरोग मुक्तीच्या दिशेने महाराष्ट्र एक मोठे पाऊल टाकत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *