
पुणे (pragatbharat.com) : पुणेकरांसाठी, विशेषतः आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्ग-३ मधील माण-हिंजवडी ते बालेवाडी हा पहिला टप्पा येत्या ३१ मे २०२६ पर्यंत प्रवाशांसाठी खुला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) या संदर्भात जोरदार तयारी सुरू केली आहे.
हिंजवडी आयटी हबमधील भीषण वाहतूक कोंडीमुळे हजारो कर्मचारी आणि नागरिक त्रस्त आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी मेट्रो मार्ग-३ मैलाचा दगड ठरणार आहे. या प्रकल्पाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती देताना प्रशासनाने सांगितले की, पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे ९५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. सध्या केवळ किरकोळ दुरुस्ती आणि सजावटीची अंतिम कामे सुरू आहेत. तांत्रिक चाचण्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या तपासण्या युद्धपातळीवर सुरू आहेत.
या मेट्रो सेवेच्या प्रत्यक्ष उद्घाटनाबाबत निर्णय घेण्यासाठी १५ मे रोजी ‘टाटा’ आणि ‘पीएमआरडीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत कामाचा अंतिम आढावा घेऊन मार्ग कार्यान्वित करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ही मेट्रो सेवा सुरू झाल्यास हिंजवडीतील रस्त्यांवरील वाहनांचा ताण लक्षणीयरित्या कमी होईल आणि आयटी कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा वेळ तसेच पैशांची मोठी बचत होईल. बालेवाडी स्टेडियमपर्यंतचा प्रवास यामुळे अत्यंत सुलभ आणि गतिमान होणार आहे.


