सिद्धार्थनगर रेस्क्यू ऑपरेशन: रील बनवण्याच्या नादात २ मुले पाण्याच्या टाकीवर १६ तास अडकली; भारतीय हवाई दलाने (IAF) असा वाचवला जीव

लखनौ (pragatbharat.com) : उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. सोशल मीडियासाठी रील (Reels) बनवण्याच्या नादात पाच मुले एका उंच पाण्याच्या टाकीवर चढली, मात्र अचानक शिडी तुटल्याने मोठा थरार घडला. या घटनेत एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन मुलांना तब्बल १६ तासांनंतर भारतीय हवाई दलाने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुखरूप खाली उतरवले आहे.

ही घटना कांशीराम रेसिडेन्शियल कॉलनी परिसरात घडली. शनिवारी पाच मुले उंचीवर जाऊन व्हिडिओ बनवण्यासाठी टाकीवर चढली होती. अचानक शिडी कोसळल्याने सिद्धार्थ, शनी आणि गोलू ही तीन मुले खाली पडली. या अपघातात सिद्धार्थ याचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला, तर शनी आणि गोलू सध्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, पवन आणि कल्लू ही दोन मुले पाण्याच्या टाकीच्या वरच्या बाजूला अडकून पडली. खाली उतरण्याचा कोणताही मार्ग नसल्याने आणि प्रचंड उंची असल्याने स्थानिक प्रशासनाला त्यांना वाचवण्यात अडचणी येत होत्या.

अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भारतीय हवाई दलाची (IAF) मदत घेण्यात आली. रविवारी सकाळी हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचून अत्यंत क्लिष्ट अशा बचाव मोहिमेला सुरुवात केली. १६ तास अन्न आणि पाण्याविना मृत्यूच्या छायेत असलेल्या या दोन्ही मुलांना हवाई दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. या थरारक मोहिमेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, जीव धोक्यात घालून रील बनवणाऱ्या तरुणाईला या घटनेने मोठा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *