
मुंबई (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ (IPL 2026) चा थरार सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून मैदानातील वाद आणि राडे थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. काल चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात हैदराबादने विजय मिळवून प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले. मात्र, या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज हेनरिक क्लासेन आणि संजू सॅमसन यांच्यात झालेला मैदानातील वाद सध्या क्रीडा विश्वात प्रचंड चर्चेचा आणि वादाचा विषय ठरला आहे. बाद झाल्यानंतर संतापलेला क्लासेन थेट संजू सॅमसनकडे पाहून थुंकल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
स्टम्पिंगवरून वादाची ठिणगी आणि संताप नेहमी शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा संजू सॅमसन आणि दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक खेळाडू हेनरिक क्लासेन यांच्यात सामन्याच्या १५ व्या ओव्हरमध्ये वादाची ठिणगी पडली. फिरकीपटू नूर अहमदच्या गुगली चेंडूवर क्लासेनने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला. क्लासेनचा पाय हवेत क्रीझच्या बाहेर जाताच यष्टीरक्षक संजू सॅमसनने क्षणाचाही विलंब न लावता त्याची अप्रतिम स्टम्पिंग (Stumping) केली. क्लासेनला आपण नाबाद असल्याचा विश्वास होता, मात्र थर्ड अंपायरने (Third Umpires) त्याला ‘आऊट’ घोषित केले.
संजूकडे पाहून थुंकला क्लासेन; खुन्नसचा व्हिडिओ व्हायरल अंपायरच्या निर्णयानंतर संजू सॅमसन मैदानात क्लासेनकडे नजर रोखून पाहत उभा होता. ही गोष्ट क्लासेनला प्रचंड खटकली आणि दोघांमध्ये मैदानावरच तीव्र शाब्दिक वादावादी सुरू झाली. दोन्ही संघांतील इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर क्लासेन पॅव्हेलियनकडे परतत असताना, त्याने मागे वळून अत्यंत संतापलेल्या अवस्थेत संजू सॅमसनच्या दिशेने पाहून थुंकले (Spitting Controversy). आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका वरिष्ठ खेळाडूचे हे वर्तन क्रिकेटच्या नियमांना आणि ‘जेन्टलमन गेम’च्या संस्कृतीला धक्का लावणारे ठरले असून, त्याच्यावर आयपीएल प्रशासनाकडून कडक दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हैदराबादची प्लेऑफमध्ये धडक, चेन्नई अडचणीत या सामन्यात क्लासेनने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर १८०.७७ च्या धडाकेबाज स्ट्राईक रेटने २६ चेंडूत ४७ धावा कुटल्या. त्याने इशान किशनसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करून सामना हैदराबादच्या बाजूने झुकवला. हैदराबादने १८१ धावांचे आव्हान १९ व्या ओव्हरमध्ये ५ विकेट्स राखून पूर्ण केले. या पराभवामुळे चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग आता अधिक खडतर झाला आहे. यंदाच्या मोसमात हेनरिक क्लासेनने १३ सामन्यांत ५५५ धावा करत दमदार कामगिरी केली आहे, मात्र कालच्या या वादग्रस्त प्रकरणामुळे त्याच्यावर क्रीडाप्रेमींमधून तीव्र टीका होत आहे.

