जनगणना २०२७ चा श्रीगणेशा! १ मे पासून प्रक्रियेला सुरुवात; पुण्यात महाराष्ट्र दिनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे नागरिकांना आवाहन

पुणे (pragatbharat.com) : जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला आज १ मे २०२६ पासून राज्यभरात प्रारंभ झाला आहे. पुण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभात नगर विकास व परिवहन राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ यांनी नागरिकांना या ऐतिहासिक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. पुणे पोलीस कवायत मैदानावर हा मुख्य शासकीय समारंभ उत्साहात पार पडला.

जनगणनेचे वेळापत्रक आणि स्वरूप: राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात ‘घर यादी आणि घरगणना’ केली जाणार आहे.

  • १ ते १५ मे: नागरिकांसाठी ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध असेल.
  • १६ मे ते १४ जून: प्रगणक प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील. नागरिकांनी विचारलेल्या माहितीची अचूक नोंद करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

सामाजिक समता व समरसता वर्ष: महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना राज्यमंत्र्यांनी जाहीर केले की, यंदाचे वर्ष ‘सामाजिक समता व समरसता वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती, संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून हा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्कृष्ट सेवेसाठी पोलिसांचा गौरव: यावेळी २०२५ सालासाठीचे ‘पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह’ प्रदान करण्यात आले. अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सपोआ विशाल हिरे यांच्यासह एकूण ४९ पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी सन्मानित करण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि पोलीस हवालदारांचा समावेश होता.

या समारंभाला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *