
जळगाव (pragatbharat.com) : मुंबई उच्च न्यायालयाच्या कर्मचारी भरती प्रक्रियेला गालबोट लावणारी एक घटना जळगाव शहरात समोर आली आहे. लेखी परीक्षेदरम्यान कडक निर्बंध असतानाही परीक्षा केंद्रात चोरून मोबाईल नेणाऱ्या एका परीक्षार्थी उमेदवाराला जळगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडून अटक केली आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमका प्रकार काय? मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत लिपिक (Clerk), शिपाई (Peon) आणि वाहनचालक (Driver) या पदांसाठी सध्या लेखी परीक्षा सुरू आहे. जळगावमधील गणेश कॉलनी परिसरातील प. न. लुंकड कन्या शाळेमध्ये या परीक्षेचे केंद्र होते. परीक्षा सुरू असताना एका उमेदवाराने प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून परीक्षा कक्षात मोबाईल नेल्याचे निदर्शनास आले. केंद्र प्रमुखांना संशय आल्याने त्यांनी झडती घेतली असता, उमेदवाराकडे मोबाईल आढळून आला.
गुन्हा दाखल आणि अटक: परीक्षा केंद्रात मोबाईल किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण नेण्यास कडक मनाई असतानाही या उमेदवाराने हा प्रकार केल्यामुळे, परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षकांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. जळगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित परीक्षार्थी उमेदवाराविरोधात महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
उमेदवारावर होणार मोठी कारवाई: उच्च न्यायालयाच्या नियमानुसार, अशा प्रकारे गैरप्रकार करणाऱ्या उमेदवाराला कायमस्वरूपी काळबदी (Debar) केले जाऊ शकते. या घटनेमुळे इतर परीक्षा केंद्रांवरही कडक तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामागे काही मोठी टोळी सक्रिय आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

