वॉकिंग ट्रॅकवर सकाळ-सायंकाळ फिरणाऱ्या नागरिकांमध्ये भीती; महापालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
चिखली (pragatbharat.com): टाळगाव-चिखली प्रभाग क्रमांक एकमधील धर्मराजनगर रोडलगत असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘प्रति दुर्गा टेकडी’ वनीकरण परिसरात डुकरांचे कळप मोठ्या प्रमाणात फिरत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये लहान पिल्लांसह अनेक डुकरे दिसत असल्याने सकाळी आणि सायंकाळी वॉकिंग ट्रॅकवर चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रति दुर्गा टेकडी परिसरात महापालिकेने मोठ्या प्रमाणात वनीकरण केले असून नागरिकांसाठी पायवाट आणि वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला आहे. परिसरातील धर्मराजनगर, पाटीलनगर आणि आसपासच्या भागांतील अनेक नागरिक नियमितपणे येथे फिरण्यासाठी येतात. टेकडीच्या जवळच पीएमपीएमएल बसथांबा आणि संतपीठाची मोठी शाळा असल्याने विद्यार्थी, पालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांची मोठी वर्दळ असते.
प्रत्यक्ष छायाचित्रांमध्ये वनीकरण परिसरातील कचऱ्याच्या ठिकाणी अनेक डुकरे अन्न शोधताना दिसत आहेत. काही ठिकाणी प्लास्टिक, खाद्यपदार्थांची पाकिटे आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. या कचऱ्यामुळे डुकरांचे कळप परिसरात आकर्षित होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, टेकडीच्या आतील भागात काही व्यक्तींकडून मांसाहारी पदार्थांचे अवशेष आणि खाद्यपदार्थ टाकले जात असल्याने डुकरांचा वावर वाढत आहे. हे पदार्थ नेमके कोण टाकत आहे, याची महापालिकेने चौकशी करावी. तसेच डुकरांना या परिसरात जाणीवपूर्वक आणून सोडले जात आहे का, याचाही संबंधित विभागाने तपास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
डुकरांच्या कळपामुळे अचानक हल्ला होण्याची किंवा नागरिकांचा पाठलाग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यात एखाद्या नागरिकाला दुखापत झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी महापालिकेच्या पशुवैद्यकीय, आरोग्य आणि उद्यान विभागाने संयुक्तपणे तातडीची उपाययोजना करावी. डुकरांना कायदेशीर आणि सुरक्षित पद्धतीने पकडून योग्य ठिकाणी हलवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
टाळगाव-चिखली प्रभाग क्रमांक एकमधील धर्मराजनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचाही वाढता उपद्रव
धर्मराजनगर कॉलनी क्रमांक एक, दोन आणि तीन परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचे टोळके रस्त्यावर फिरत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महापालिकेने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि आवश्यक नियंत्रणात्मक कारवाई नियमितपणे करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
वॉकिंग ट्रॅकची दुरुस्ती आणि सुशोभीकरण आवश्यक
प्रति दुर्गा टेकडीवरील वॉकिंग ट्रॅकच्या काही भागांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक खचलेले किंवा विस्कळीत झाले आहेत. ट्रॅकची दुरुस्ती, नियमित स्वच्छता, कचरा उचलणे, पुरेशी प्रकाशव्यवस्था, संरक्षक जाळी आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. प्रभाग क्रमांक एकमधील लोकप्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांनी या समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


