
मुंबई/नांदेड (pragatbharat.com) : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत मोठा आणि धक्कादायक राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे (UBT) गटात उभी फूट पडल्याचे जवळपास निश्चित झाले असून, पक्षाचे ९ पैकी ६ खासदार बंडखोरीच्या तयारीत आहेत. या खासदारांना फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी राबवलेले ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) आता अंतिम टप्प्यात आले आहे. मंगळवारी संध्याकाळी नांदेड विमानतळावरून दोन विशेष चार्टर्ड विमानांनी हे खासदार राजधानी दिल्लीत दाखल झाले असून, आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याची दाट शक्यता आहे.
नांदेडमधील दोन विमाने अन् इन्साईड स्टोरी मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, ‘ऑपरेशन टायगर’ अत्यंत गुप्त पद्धतीने राबवण्यात आले. दिल्लीला जाण्यासाठी नांदेड विमानतळावर अचानक दोन खाजगी विमाने आली होती; ज्यातील एक विमान दिल्लीवरून तर दुसरे मुंबईवरून आले होते. परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख हे या विमानांमधून दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासदार आष्टीकर हे सुरुवातीला हादगाववरून बायरोड हैदराबादला गेले आणि तिथून विमानाने दिल्लीत पोहोचले. या विमानांमध्ये ८ ते १० महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश होता.
ठाकरेंची साथ सोडणारे संभाव्य ६ खासदार कोणते? ठाकरे गटाचे एकूण ९ लोकसभा खासदार आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार, अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी किमान दोन-तृतीयांश (म्हणजेच ६ खासदार) एकत्र येणे गरजेचे आहे. सध्या खालील ६ खासदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे: १. संजय जाधव (परभणी) २. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) ३. संजय देशमुख (यवतमाळ-वाशिम) ४. ओमराजे निंबाळकर (धाराशिव) ५. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) ६. राजाभाऊ वाजे (नाशिक) किंवा संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)
आईबाबा ते साईबाबांच्या शपथा हवेत विरल्या! दोन दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला केवळ ४ खासदार प्रत्यक्ष हजर होते, तर उर्वरित ५ खासदारांनी कौटुंबिक आणि आजारपणाची कारणे देत ऑनलाइन हजेरी लावली होती. या बैठकीत सर्व खासदारांनी तुळजाभवानी, आई-बाबा आणि साईबाबांची शपथ घेऊन आपण उद्धव ठाकरेंसोबतच एकनिष्ठ राहणार असल्याच्या आणाभाका घेतल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र, अवघ्या ४८ तासांत या शपथा बाजूला ठेवत ६ खासदारांनी दिल्लीची वाट धरल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
पुढील रणनीती: लोकसभा अध्यक्षांची भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तातडीने दिल्लीत दाखल झाले असून, मध्यरात्री या खासदारांसोबत त्यांची एक गुप्त बैठक पार पडल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, बंडखोर खासदार आज सकाळी लोकसभा अध्यक्षांना आपल्या स्वाक्षऱ्यांचे अधिकृत पत्र देऊन संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची परवानगी मागू शकतात. शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी (१९ जून) हा जाहीर प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


