
पालघर (pragatbharat.com) : पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसराला हादरवून सोडणाऱ्या एका गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात पालघर पोलिसांना मोठे यश आले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या २३ वर्षीय आरोपीला शेजारील गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातून शनिवारी रात्री ताब्यात घेण्यात आले.
१ जून रोजी पीडितांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे पालघर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभीर्य आणि पीडितांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश असल्यामुळे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कडक कलमे लावली आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार झाला होता, ज्याला शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके विविध राज्यांमध्ये तैनात करण्यात आली होती.
चित्रा वाघ यांनी घेतली होती दखल: या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ६ जून रोजी डहाणू पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला होता. तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला भरूचमधून अटक केली असून, त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी महाराष्ट्रात आणण्यात आले आहे.


