
मुंबई (pragatbharat.com) : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते राज अर्जुन (Raj Arjun) यांनी त्यांची मुलगी आणि ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाची स्टार अभिनेत्री सारा अर्जुन (Sara Arjun) हिच्या वाढदिवसानिमित्त एक अत्यंत भावुक आणि हृदयस्पर्शी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. मुलीसोबतच्या जुन्या आठवणींचा एक सुंदर व्हिडिओ आणि फोटो कोलाज शेअर करत राज अर्जुन यांनी साराला “माझं संपूर्ण जग” असे म्हटले आहे. त्यांची ही भावनिक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
राज अर्जुन यांनी आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले की, सारा ही त्यांच्यासाठी केवळ मुलगी नाही, तर एक प्रार्थना, मनाला मिळणारा विरंगुळा आणि त्यांचे संपूर्ण आकाश आहे, जिने त्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणि आनंद आणला. साराच्या येण्याने त्यांचे आयुष्य पूर्णपणे कसे बदलून गेले, याचे सुंदर वर्णन त्यांनी केले आहे. आपल्या संदेशाचा शेवट करताना ते म्हणाले, “माझ्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्यामुळेच माझ्या सकाळमध्ये एक नवा प्रकाश आहे, माझ्या संध्याकाळ शांत आणि निवांत आहेत, माझ्या प्रार्थनांवर माझा विश्वास आहे; तू माझं संपूर्ण जग आहेस.” वडिलांच्या या सुंदर पोस्टवर साराने देखील “पापा” अशी कमेंट करत हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत.
‘धुरंधर’ चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ : अभिनेत्री सारा अर्जुन अलीकडेच रणवीर सिंगच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटात तिने ‘यालिना जमाली’ ही भूमिका साकारली असून, ती प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. ‘धुरंधर’ चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्ना यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांची फौज आहे. या अॅक्शनपटाने जगभरात १७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास रचला आहे आणि अजूनही या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. अशा मोठ्या चित्रपटाचा भाग असलेल्या आपल्या मुलीच्या कौतुकाने राज अर्जुन भावुक झाले आहेत.


