
मुंबई (pragatbharat.com) : टीव्ही जगतातील अत्यंत लोकप्रिय आणि लाडकं जोडपं करण कुंद्रा (Karan Kundrra) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) हे नेहमीच त्यांच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. नुकतेच त्यांच्या ‘देशी ब्लाँग’ (Desi Bling) या शोदरम्यान करणने आपल्या पालकांशी चर्चा करून तेजस्वीला लग्नासाठी प्रपोज केले होते. मात्र, आयुष्यातील इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी पालकांची परवानगी किंवा सल्ला का घेतला, यावरून सोशल मीडियावर काही युजर्सनी करणला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता या ट्रोलर्सना करण कुंद्राने अत्यंत तीव्र शब्दांत फटकारले असून भारतीय संस्कृतीची आठवण करून दिली आहे.
प्रसिद्ध अँकर सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या एका मुलाखतीत करण कुंद्राचा संताप अनावर झाला. ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना तो म्हणाला, “जे लोक म्हणत आहेत की मी माझ्या पालकांशी बोलायला नको होते, अशा लोकांची मला कीव येते. जर आपण आपल्या आई-वडील आणि भावंडांशी चर्चा करणार नाही, तर मग कोणाशी करणार? आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती आली म्हणून तुम्ही तुमच्या पालकांचे स्थान विसरू शकत नाही.”
“तुम्ही कर्दाशियन्सच्या घरात जन्माला आलात का?” : करणने पुढे ट्रोलर्सवर निशाणा साधत म्हटले की, “जे लोक मला कमेंट करून सांगत आहेत की पालकांशी का बोललास? भाई, तुम्ही कोणत्या जगात जगताय? तुमचा जन्म भारतात झाला आहे की तुम्ही ‘कर्दाशियन्स’ (Kardashians) च्या घरात जन्माला आलात?” यासोबतच त्याने स्पष्ट केले की, स्वतः तेजस्वी प्रकाशला देखील त्याने पालकांशी चर्चा केल्याबद्दल कोणतीही अडचण नव्हती.
करण आणि तेजस्वी यांची लव्हस्टोरी ‘बिग बॉस १५’ च्या घरात सुरू झाली होती. तेव्हापासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये असून लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. नुकतेच दुबईत शूट झालेल्या एका भागात करणने गुडघ्यावर बसून अतिशय भव्य दिव्य पद्धतीने तेजस्वीला प्रपोज केले, ज्यामध्ये पाण्यात मोठ्या अक्षरात “Will You Marry Me?” असे लिहिले होते. हा भावनिक क्षण चाहत्यांच्या पसंतीस उतरला असतानाच ट्रोल करणाऱ्यांना करणने आता योग्य धडा शिकवला आहे.


