दिल्ली हादरली! विवेक विहार भागात भीषण आग लागून ९ जणांचा होरपळून मृत्यू; चार मजली इमारतीत पहाटे घडली दुर्घटना

नवी दिल्ली (pragatbharat.com) : देशाची राजधानी दिल्लीतील विवेक विहार परिसरात आज पहाटे एका चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. दिल्ली अग्निशमन दलाला पहाटे या घटनेची माहिती मिळाली, ज्यानंतर तातडीने १४ अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले.

अग्निशमन अधिकारी मुकेश वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर सकाळी ६:२५ वाजेपर्यंत नियंत्रण मिळवण्यात यश आले. बचावकार्यादरम्यान इमारतीतून १५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले, मात्र दुर्दैवाने ९ जणांचा जीव वाचवता आला नाही. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली असून सध्या कुलिंग ऑपरेशन पूर्ण झाले आहे.

दिल्लीचे उपराज्यपाल तरनजीत सिंह संधू आणि मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. उपराज्यपालांनी मृतांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना व्यक्त केल्या असून जखमींना सर्वतोपरी वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले की, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA), अग्निशमन दल आणि दिल्ली पोलीस मदतकार्यात पूर्णपणे गुंतले आहेत. बाधित कुटुंबांना शासनाकडून सर्व शक्य ती मदत केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *