दिवंगत डॉ. अशोक (भाऊ) शिलवंत यांच्या ६४ व्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव व सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पिंपरी (pragatbharat.com) : दिवंगत समाजसेवक, शिक्षणप्रेमी व अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे संस्थापक डॉ. अशोक (भाऊ) शिलवंत यांच्या ६४ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

इयत्ता दहावीच्या परीक्षेत संपूर्ण पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कु. प्रणव लोटन शिंदे आणि कु. आरती नागप्पा खैतनार यांचा शिष्यवृत्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जागृत अपंग संघटना संचलित महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्र, माण येथील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत आयु. मानव कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्षीय समारोप करताना त्यांनी डॉ. अशोक (भाऊ) शिलवंत यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, “समाजात केवळ मागणारे न होता देणारे होण्याची वृत्ती जोपासली पाहिजे. डॉ. अशोक (भाऊ) शिलवंत यांनी आपल्या आयुष्यात समाजाला देण्याचे कार्य अखंडपणे केले. त्यांचे समाजकार्य, शिक्षणप्रेम आणि सर्वसामान्यांप्रती असलेली बांधिलकी ही कधीही विसरता येणार नाही. आज शिलवंत परिवार त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समर्थपणे पुढे नेत असून, हा उपक्रम त्याच सामाजिक जाणिवेचे आणि सेवाभावाचे जिवंत उदाहरण आहे.” संस्थेची माहिती देताना ते पुढे म्हणाले की अपंगांनी अपंगांसाठी चालवलेली देशातील एकमेव संस्था असेल.

यावेळी बोलताना आयु. मानव कांबळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “इयत्ता दहावीच्या परीक्षेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शाळेत प्रथम क्रमांक मिळविणारे हे विद्यार्थी पालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असून, त्यांच्या यशाने सर्व विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. आर्थिक परिस्थिती मर्यादित असली तरी जिद्द, मेहनत आणि बौद्धिक क्षमता यांच्या जोरावर कोणतीही स्वप्ने साकार करता येतात, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास हे विद्यार्थी भविष्यात निश्चितच मोठी भरारी घेतील आणि समाजाचे नाव उज्ज्वल करतील.”

डॉ. अशोक (भाऊ) शिलवंत यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी समर्पित केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेले हे उपक्रम त्यांच्या विचारांना आणि कार्याला वाहिलेली खरी आदरांजली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी संस्थेच्या कार्याध्यक्ष आयु. नलिनी इनामदार , संस्थेचे मुख्याध्यापक आयु. जगताप सर सामाजिक कार्यकर्ते आयु. प्रताप गुरव, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी आयु. शरद जाधव, आयु. रवींद्र दुधेकर, आयु. वसंत साळवी तसेच आयु. अनिल सूर्यवंशी तसेच श्रीमती कल्पना अशोक शिलवंत यांची प्रमुख उपस्थिती

प्रास्ताविक : डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर
सूत्रसंचालन : प्रा. दिलीप कांबळे
आभार प्रदर्शन : ॲड. राजरत्न शिलवंत यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन अशोक सर्वांगीण विकास सोसायटी, पुणे यांच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *