प्रसूतीनंतरच्या महिलांसाठी मोफत HPV लसीकरण अभियान राबविण्याची मागणी -नगरसेविका श्रुतीताई वाकडकर

पिंपरी (pragatbharat.com) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) संरक्षण मिळावे यासाठी पात्र महिला व मुलींना एचपीव्ही (HPV) लस मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्य सौ. श्रुतीताई वाकडकर यांनी केली आहे.

यासंदर्भात सौ. श्रुतीताई वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत महानगरपालिकेने याबाबत विशेष योजना राबविण्याची मागणी त्यांनी केली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमधील गंभीर व जीवघेण्या आजारांपैकी एक असून एचपीव्ही विषाणू हा त्याचे प्रमुख कारण मानला जातो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते एचपीव्ही लसीकरणामुळे या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

सध्या शालेय स्तरावर मुलींसाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत विविध उपक्रम राबविले जात असले तरी विवाहिता, नवमाता (प्रसूती झालेल्या महिला) तसेच प्रजनन वयोगटातील महिलांपर्यंत या प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा अपेक्षित प्रमाणात विस्तार झालेला दिसून येत नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या सर्व प्रसूतीगृहे, रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे समुपदेशन करून त्यांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत मार्गदर्शन करण्यात यावे तसेच वैद्यकीय निकषांनुसार पात्र महिलांसाठी विशेष एचपीव्ही लसीकरण अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय महानगरपालिकेच्या सर्व शासकीय रुग्णालये, प्रसूतीगृहे व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये पात्र महिला व मुलींना मोफत एचपीव्ही लस उपलब्ध करून देणे, व्यापक जनजागृती मोहीम राबविणे, नियमित तपासणी व स्क्रीनिंग कार्यक्रम आयोजित करणे आणि महिलांच्या आरोग्याबाबत विशेष समुपदेशन करणे, अशा मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.

महिलांचे आरोग्य सुदृढ राहणे ही समाजाच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत गरज असून, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन मोफत एचपीव्ही लसीकरण योजना राबवावी, अशी मागणी श्रुतीताई वाकडकर यांनी केली आहे.

आपल विश्वासू,
संतोष शिंदे
स्वीय सहाय्यक
सौ. श्रुतीताई वाकडकर
नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्य
पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *