नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाइंग यांच्यात द्विपक्षीय चर्चा; सीमा सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटीवर भर

नवी दिल्ली (pragatbharat.com) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाइंग (U Min Aung Hlaing) यांच्यात आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे अत्यंत महत्त्वाची द्विपक्षीय चर्चा संपन्न झाली. म्यानमारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर राष्ट्राध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर यू मिन आंग ह्लाइंग यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ करण्यासोबतच सीमा सुरक्षा, व्यापार आणि दळणवळण (Connectivity) वाढवण्यावर सकारात्मक चर्चा झाली.

सांस्कृतिक आणि धोरणात्मक भागीदारीवर भर:

म्यानमार हा भारताचा अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक शेजारी देश असून त्याची तब्बल १६४० किमीची सीमा भारताच्या ईशान्येकडील राज्यांना जोडलेली आहे. त्यामुळे या बैठकीत दोन्ही देशांमधील सीमा सुरक्षा आणि दहशतवाद विरोधी सहकार्याला अधिक मजबूत करण्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले. भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट’ (Neighborhood First), ‘ॲक्ट ईस्ट’ (Act East) आणि जागतिक स्तरावरील ‘महासागर’ (MAHASAGAR) या तिन्ही महत्त्वाच्या परराष्ट्र धोरणांच्या केंद्रस्थानी म्यानमार आहे. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील बहुआयामी संबंधांना एक नवी दिशा मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

पाच दिवसीय भारत दौरा आणि मुंबई भेट:

राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाइंग हे एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह, ज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आणि आघाडीचे उद्योगपती समाविष्ट आहेत, पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर शनिवारी बिहारमधील गया येथे पोहोचले होते. त्यांनी बोधगया येथील जागतिक प्रसिद्ध महाबोधी मंदिराला भेट देऊन प्रार्थना केली. नवी दिल्लीत आल्यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. आज संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष ह्लाइंग हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेणार असून, राय पिथोरा सांस्कृतिक संकुलातील भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. त्यानंतर उद्या, मंगळवारी ते देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधण्यासाठी रवाना होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *