
नवी दिल्ली (pragatbharat.com) : देशातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि जलस्रोतांचे अचूक नियोजन करण्यासाठी केंद्र सरकारने एक अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील (CR Patil) आणि केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत जल क्षेत्रातील संशोधन आणि विकासावरील (R&D) राष्ट्रीय कार्यशाळेचे संयुक्तपणे उद्घाटन केले. या विशेष प्रसंगी, जलस्रोतांचे मूल्यमापन, देखरेख आणि व्यवस्थापनासाठी उपग्रह-आधारित प्रगत तंत्रज्ञानाचा वापर मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालय आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्यात एक सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरित करण्यात आला.
इस्रोसोबतचा करार आणि अंतराळ अर्थव्यवस्था: या भागीदारी अंतर्गत उपग्रहांच्या मदतीने पाणी साठ्यांचे अचूक मॅपिंग, भूजल पातळीचा अंदाज आणि पूर-दुष्काळाचे आगाऊ नियोजन करण्यासाठी २४ प्राधान्यक्रमाचे अभ्यास क्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘होोल ऑफ गव्हर्नमेंट’ (संपूर्ण सरकार एक म्हणून काम करेल) या संकल्पनेचे हे उत्तम उदाहरण आहे. भारताची अंतराळ अर्थव्यवस्था सध्या ९ अब्ज डॉलरवर असून ती आगामी काळात १० पटीने वाढणार आहे.” या अंतराळ तंत्रज्ञानाचा थेट फायदा आता देशाच्या कृषी आणि जल क्षेत्राला होणार आहे.
‘MAHA On Water’ मिशनचा शुभारंभ: या कार्यशाळेत दोन्ही मंत्र्यांच्या हस्ते जल क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधनाला गती देण्यासाठी ‘मिशन फॉर ॲडव्हान्समेंट इन हाय-इम्पॅक्ट एरियाज फॉर वॉटर’ (MAHA on Water) या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम जलशक्ती मंत्रालय आणि अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जात आहे. या मिशन अंतर्गत पिण्याचे पाणी, हवामान लवचिकता (Climate Resilience), पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जलसंधारण या क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या नवनवीन शोधांना व तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जाईल.
केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितले की, देशाच्या विविध भागांतून आलेले तज्ज्ञ आणि वैज्ञानिक या कार्यशाळेत पाणी टंचाईच्या उपायांवर सखोल चर्चा करत आहेत. २०२७ पर्यंतच्या विविध जल योजनांना गती देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ चे स्वप्न साकार करण्यासाठी ही क्रांतिकारी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.


