नागपूर बोर्डाचा मोठा दणका! जीवशास्त्राच्या पेपरमध्ये ‘मास कॉपी’, २४३ विद्यार्थी नापास; दोन परीक्षा केंद्रे कायमची रद्द

नागपूर (pragatbharat.com) : बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपी (Mass Copying) केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले असून नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने यावर कठोर कारवाई केली आहे. जीवशास्त्र (Biology) विषयाच्या पेपरमध्ये सर्वांची उत्तरे ‘सेम टू सेम’ आढळल्यामुळे मंडळाने २४३ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित दोन परीक्षा केंद्रे कायमची रद्द करण्यात आली आहेत.

ही कारवाई प्रामुख्याने गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यातील केंद्रांवर करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील कोदुर्ली येथील माउली कनिष्ठ महाविद्यालयातील १२५ विद्यार्थ्यांनी, तर वर्धा जिल्ह्यातील वाशी येथील जे. डी. चौधरी शाळेतील ११८ विद्यार्थ्यांनी जीवशास्त्राचा पेपर चक्क एकसारखा लिहिला होता. उत्तरपत्रिका तपासताना शिक्षकांना उत्तरांमधील धक्कादायक साधर्म्य दिसून आले, त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली.

तपासादरम्यान विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे सिद्ध झाले आहे. नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी सांगितले की, “दोषी विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यासोबतच, त्यांना कॉपी करण्यासाठी मदत करणाऱ्या शिक्षकांवरही कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांचीही चौकशी सुरू आहे.”

याशिवाय, गडचिरोली जिल्ह्यातील बोमलवार कनिष्ठ महाविद्यालयातील केंद्रावर भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ४२ विद्यार्थी कॉपी करताना पकडले गेले आहेत, त्यांनाही अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. या मोठ्या कारवाईमुळे परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकारांना चाप बसण्याची शक्यता असून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून या निर्णयाचे स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *