‘पण त्यांची ती अट मला मान्य नव्हती’; सुनेत्रा पवारांसोबत झालेल्या बैठकीवर नवनीत राणांचा खळबळजनक खुलासा!

मुंबई (pragatbharat.com) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) अंतर्गत रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अखेर राजेंद्र जैन (Rajendra Jain) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, या उमेदवारीच्या अंतिम घोषणेपूर्वी राजकीय वर्तुळात अनेक मोठ्या घडामोडी घडल्याचे आता समोर येत आहे. भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि त्यांनी खासदारकीची ऑफर का नाकारली, याबाबत फेसबुक पोस्ट करत एक मोठा खुलासा केला आहे.

राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची होती अट: सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. स्वतः नवनीत राणा यांनी यावर पडदा उचलत सांगितले की, “आदरणीय सुनेत्रा वहिनी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पार्थ पवार यांनी मला राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यासाठी त्यांनी माझ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची अट ठेवली होती. ही अट मला अजिबात मान्य नव्हती.”

देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेवरून घेतली होती भेट: आपली भूमिका स्पष्ट करताना नवनीत राणा म्हणाल्या की, “मी भारतीय जनता पार्टीची (BJP) एक प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ती आहे. केवळ कोणत्याही पदासाठी मी माझी विचारधारा बदलणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सूचनेवरूनच मी सुनेत्रा वहिनींची प्रत्यक्ष भेट घेतली होती. ही जागा भाजपला सोडण्याबाबत मी त्यांना विनंती केली होती, परंतु काही कारणास्तव ते शक्य झाले नाही.”

छगन भुजबळांचे पत्ते ‘या’ अटीमुळे कट झाले: या राज्यसभेच्या जागेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचेही नाव आघाडीवर होते. मात्र, भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळावे, अशी अट भुजबळांनी ठेवली होती. या अटीला भाजपच्या वरिष्ठ श्रेष्ठींनी साफ नकार दिल्यामुळे छगन भुजबळ यांचे राज्यसभेवर जाणे बारगळले. अखेर नवनीत राणा, छगन भुजबळ आणि अमरसिंह पंडित यांना मागे टाकत राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेची लॉटरी लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *