
मुंबई (pragatbharat.com) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) राज्यसभेसाठी राजेंद्र जैन यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नाराजीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. भुजबळ हे राज्यसभेच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असताना ऐनवेळी त्यांचा पत्ता कसा कट झाला, याची ‘इनसाईड स्टोरी’ आता समोर येत आहे. या संपूर्ण घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी एक मोठे आणि सूचक विधान केले आहे.
दिल्लीतून मंजुरी मिळाली नसेल – शशिकांत शिंदे: छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायावर बोट ठेवत शशिकांत शिंदे म्हणाले, “भुजबळ हे नेहमीच संघर्ष करणारे नेते राहिले आहेत. ते राज्यसभेवर जाणार असल्याची चर्चा होती, मात्र ऐनवेळी त्यांचे नाव मागे पडले. कदाचित दिल्लीमधून (भाजप श्रेष्ठींकडून) त्यांच्या नावाला मंजुरी मिळाली नसेल, तिथेच काहीतरी राजकारण झाले असावे.” पुढे बोलताना त्यांनी भुजबळांना सल्ला दिला की, “जोपर्यंत हे ताकदवान नेते आदरणीय शरद पवार साहेबांसोबत होते, तोपर्यंत त्यांना नेहमी न्याय मिळाला. पवार साहेबांनी अनेकांना शून्यातून उभे केले. मग आता तो न्याय का मिळत नाही? याचा विचार भुजबळांनी स्वतः केला पाहिजे.”
समीर भुजबळांच्या मंत्रिपदाची ‘ती’ अट नडली: मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांची राज्यसभेवर जाण्याची पूर्ण तयारी होती. मात्र, त्यांनी पक्षासमोर एक मोठी अट ठेवली होती. आपण दिल्लीत राज्यसभेवर गेल्यानंतर महाराष्ट्रात रिक्त होणाऱ्या मंत्रिपदावर आपले पुतणे समीर भुजबळ (Samir Bhujbal) यांची वर्णी लागावी, अशी भुजबळांची मागणी होती. अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. फडणवीस यांनी हा चेंडू भाजपच्या दिल्लीतील केंद्रीय श्रेष्ठींच्या कोर्टात टाकला. मात्र, दिल्लीतून या अटीला स्पष्ट नकार मिळाल्यामुळे अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत भुजबळ आणि अमरसिंह पंडित यांचे नाव मागे पडून राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.


