
मुंबई (pragatbharat.com) : केंद्र सरकारच्या पद्म पुरस्कार २०२७ साठी महाराष्ट्रातून पात्र व्यक्तींच्या नावांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र, या समितीतून राज्याचे विद्यमान सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना धक्कादायकरीत्या वगळण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांचा पायंडा मोडीत काढत सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, या शिफारस समितीच्या अध्यक्षपदी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वास्तविक पाहता, पद्म पुरस्कारांसाठी कला, साहित्य, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गजांची नावे सुचवली जातात, ज्याचा थेट संबंध सांस्कृतिक विभागाशी असतो. तरीही, या विभागाचे मंत्री असूनही शेलार यांना समितीत स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
या सात सदस्यीय समितीत मंत्री हसन मुश्रीफ, दादाजी भुसे, डॉ. उदय सामंत, पंकजा मुंडे, आदिती तटकरे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या समितीत मुंबईतील एकाही मंत्र्याला स्थान देण्यात आलेले नाही. आशिष शेलार हे मुंबईचे भाजपचे महत्त्वाचे नेते आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री असतानाही त्यांना डावलण्यात आल्याने महायुतीमध्ये ‘ऑल इज वेल’ आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या निर्णयामुळे सांस्कृतिक क्षेत्रातील नामांकनांवर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

