पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप: सुवेंदु अधिकारी यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला; जाणून घ्या कोण आहेत हे ‘जायंट किलर’

कोलकाता (pragatbharat.com) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा राजकीय उलटफेर भवानीपूर मतदारसंघात पाहायला मिळाला. भाजपचे फायरब्रँड नेते सुवेंदु अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना तब्बल १५,१०५ मतांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, भवानीपूर हा ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र सुवेंदु अधिकारी यांनी तिथेच त्यांना धोबीपछाड दिली आहे.

कोण आहेत सुवेंदु अधिकारी? ५५ वर्षीय सुवेंदु अधिकारी हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली नाव आहे. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९७० रोजी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी येथे एका राजकीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे देखील केंद्रात मंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते आहेत. विद्यार्थी राजकारणातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सुवेंदु यांनी २००७ मधील नंदीग्राम आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. याच आंदोलनाने बंगालमध्ये डाव्यांची ३४ वर्षांची सत्ता उखडून टाकली होती.

अविवाहित राहण्यामागचे खास कारण: सुवेंदु अधिकारी अजूनही अविवाहित असून त्यांनी समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की, स्वातंत्र्यसैनिक सतीश सामंत, सुशील धारा आणि अजय मुखर्जी यांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे. या थोर नेत्यांप्रमाणेच अविवाहित राहून देशसेवा करण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले आहे.

२०२० मध्ये तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुवेंदु अधिकारी यांनी सातत्याने ममता बॅनर्जींसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. २०२१ मध्ये त्यांनी नंदीग्राममध्ये ममता दीदींना हरवले होते आणि आता २०२६ च्या निवडणुकीत भवानीपूरमध्ये पुन्हा एकदा त्यांनी आपला करिष्मा सिद्ध केला आहे. या विजयामुळे सुवेंदु अधिकारी यांचे नाव आता राष्ट्रीय पातळीवर ‘जायंट किलर’ म्हणून चर्चेत आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *