प्रियकरासाठी पतीला सोडलं, पण प्रियकरानेच दिला धोका! महिलेचा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; धक्कादायक घटना

बाजपूर (pragatbharat.com) : कर्माचा फेरा कधी आणि कसा फिरेल हे सांगता येत नाही, याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना उत्तराखंडमधील उधमसिंहनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरासाठी सुखी संसार आणि पतीचा त्याग केला, मात्र त्याच प्रियकराने लग्नास नकार दिल्याने संतप्त महिलेने थेट पोलीस ठाण्यासमोर पेट्रोलची कॅन घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण? संबंधित महिलेचे लग्न २००८ मध्ये झाले होते. सर्व काही सुरळीत सुरू असताना, गेल्या दोन वर्षांपासून तिचे घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध जुळले. हे प्रेम इतके बहरले की, दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. दरम्यान, तरुणाने लग्नाचे आमिष दाखवल्याने महिलेने आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि ती प्रियकरासोबत राहू लागली. मात्र, काही दिवस एकत्र राहिल्यानंतर प्रियकराच्या कुटुंबीयांनी या लग्नाला कडाडून विरोध केला, परिणामी प्रियकरानेही महिलेशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला आणि तिला सोडून तो गावी परतला.

धक्कादायक वळण आणि विचित्र मागणी प्रियकराने दिलेला हा मोठा धक्का सहन न झाल्याने महिलेने न्यायासाठी पोलिसांकडे धाव घेतली. गुरुवारी ही महिला हातात पेट्रोलची कॅन घेऊन बाजपूर पोलीस ठाण्यासमोर पोहोचली. तिने पोलिसांसमोर एक विचित्र अट ठेवली – “एकतर प्रियकराला माझ्याशी लग्न करायला सांगा, नाहीतर मला पुन्हा माझ्या पहिल्या पतीच्या घरी पाठवा!” महिलेचा हा पवित्रा पाहून पोलीसही चक्रावून गेले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तिच्या हातातील पेट्रोलची कॅन हिसकावली आणि मोठा अनर्थ टाळला.

पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन महिलेने असाही आरोप केला आहे की, संबंधित तरुणाने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत संबंध ठेवले आणि त्याचे व्हिडिओ देखील बनवले. या व्हिडिओच्या आधारे तो तिला धमकावत होता. पोलिसांनी या प्रकरणी महिलेची तक्रार नोंदवून घेतली असून तिचे समुपदेशन (Counseling) करण्यात आले आहे. आरोपी तरुणाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले असून, या घटनेची संपूर्ण राज्यात चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *