
पुणे (pragatbharat.com) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वी (HSC) परीक्षेचा निकाल आज शनिवारी, २ मे रोजी जाहीर केला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, निकालासोबतच बोर्डाने गुणपत्रिकेच्या (Marksheet) स्वरूपात तीन मोठे बदल केले आहेत. हे बदल विद्यार्थ्यांच्या भविष्यातील ‘अपार’ (APAAR) आयडी आणि आधार कार्डाशी सुसंगत असणार आहेत.
मार्कशीटमधील ३ क्रांतिकारी बदल: १. नावाचा क्रम बदलला: आतापर्यंत मार्कशीटवर आधी विद्यार्थ्याचे आडनाव असायचे. मात्र, आता आधार कार्डच्या धर्तीवर प्रथम विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा क्रमाने नाव छापले जाईल. २. क्यूआर कोड (QR Code): गुणपत्रिकेची सत्यता तपासण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येक मार्कशीटवर एक विशिष्ट क्यूआर कोड असेल. यामुळे निकालाची पडताळणी करणे सुलभ होईल. ३. विद्यार्थ्याचा फोटो: सुरक्षेच्या दृष्टीने आणि बनावटगिरी रोखण्यासाठी यंदा गुणपत्रिकेवर विद्यार्थ्याचा फोटो देखील असणार आहे.
निकालाची ठळक वैशिष्ट्ये: यंदाच्या परीक्षेत १४ लाख ३३ हजार ०५८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.१५ टक्के आहे, तर मुलांचे प्रमाण ८६.८० टक्के इतके आहे.
कोकण विभाग पुन्हा अव्वल: विभागीय निकालात कोकण विभागाने ९४.१४ टक्के गुणांसह आपले प्रथम स्थान कायम राखले आहे. तर लातूर विभाग ८४.१४ टक्के निकालासह शेवटच्या स्थानी आहे. विशेष म्हणजे १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
सर्टिफिकेट कधी मिळणार? विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, पूर्वी गुणपत्रिका आणि बोर्ड सर्टिफिकेट मिळण्यासाठी मोठा कालावधी लागायचा. मात्र, आता निकाल लागल्यापासून १५ दिवसांच्या आत मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट एकाच वेळी विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. या नवीन प्रक्रियेमुळे बोर्डाच्या प्रशासकीय खर्चात सुमारे ३ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष यांनी दिली.

