बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; “कोठडीत मेलो तरी चालेल” म्हणत जेवण नाकारलं; प्रशासनात खळबळ

बीड (pragatbharat.com) : राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा वाटप प्रकरणातील कथित घोटाळ्यामुळे बीडचे माजी जिल्हाधिकारी आणि आयएएस (IAS) अधिकारी अविनाश पाठक यांच्या अटकेने संपूर्ण प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी अटक झाल्यापासून पाठक यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांनी कोठडीत अन्न-पाणी घेण्यासही नकार दिल्याने तणाव वाढला आहे.

“कोठडीत मेलो तरी चालेल!” मिळालेल्या माहितीनुसार, अटकेनंतर लातूर ते बीड या प्रवासादरम्यान पोलिसांनी पाठक यांना पाणी पिण्याचा आग्रह केला असता, त्यांनी अत्यंत संतप्त होऊन “मी कोठडीत मेलो तरी चालेल, पण पाणी घेणार नाही” असे म्हणत पोलिसांचा आग्रह धुडकावून लावला. गुरुवारी रात्रभर त्यांनी अन्नाचा कणही घेतला नव्हता, मात्र शुक्रवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्यांनी थोडे जेवण केले. त्यांच्या चेहऱ्यावर अटकेचा तणाव स्पष्टपणे जाणवत होता.

मुख्यमंत्री कार्यालयाचा ‘ग्रीन सिग्नल’ अविनाश पाठक हे वरिष्ठ आयएएस दर्जाचे अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पुराव्यांची भक्कम साखळी तयार केली होती. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला (CMO) सादर करण्यात आला होता. तिथून कारवाईसाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतरच पोलिसांनी अटकेचे पाऊल उचलले. पाठक यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

SIT चा फास आवळला; आणखी बडे अधिकारी रडारवर या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटी (SIT) ने आता आपला तपास अधिक तीव्र केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आणखी काही वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी पोलिसांच्या रडारवर असून, लवकरच या प्रकरणात काही मोठ्या अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पाठक यांच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी राज्य शासनाची अधिकृत पूर्वपरवानगी मिळवण्याचे कायदेशीर सोपस्कार पोलीस पूर्ण करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *