भारत-अमेरिका संरक्षण करार: भारताच्या ‘M777A2’ अल्ट्रा-लाइट हॉवित्झर तोफांसाठी अमेरिकेकडून २३० दशलक्ष डॉलर्सचे मोठे पॅकेज घोषित; दोन्ही देशांतील लष्करी सहकार्य मजबूत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन (pragatbharat.com) : भारत आणि अमेरिकेमधील धोरणात्मक व लष्करी संबंधांना अधिक बळकटी देणारी एक मोठी घडामोडी समोर आली आहे. भारताच्या ताफ्यात असलेल्या ‘M777A2’ अल्ट्रा-लाइट हॉवित्झर (Ultra-Light Howitzers) तोफांच्या देखभालीसाठी आणि दीर्घकालीन कार्यक्षमतेसाठी अमेरिकेने २३० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे १,९०० कोटींहून अधिक रुपये) किमतीचे ‘सस्टेनमेंट पॅकेज’ (Sustainment Package) जाहीर केले आहे.

अमंलबजावणीसाठी करार अंतिम टप्प्यात – राजदूत सर्जिओ गॉर:

भारतातील अमेरिकेचे नवनियुक्त राजदूत सर्जिओ गॉर (Sergio Gor) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या महत्त्वपूर्ण कराराची अधिकृत घोषणा केली. त्यांनी नमूद केले की, “अमेरिका आणि भारत दररोज एकमेकांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आमची संरक्षण भागीदारी सातत्याने वाढते आहे. भारताच्या राष्ट्रीय संरक्षणाची महत्त्वपूर्ण क्षमता टिकवून ठेवतानाच हा करार अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या उद्दिष्टांनाही बळ देईल”.

पॅकेजमध्ये काय समाविष्ट आहे?

अमेरिकेच्या डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने (DSCA) दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावित विक्रीमध्ये तोफांचे सुटे भाग (Spares), दुरुस्ती आणि परतावा सेवा (Repair and Return), तांत्रिक साहाय्य, फील्ड सर्व्हिस प्रतिनिधी, डेपो क्षमता (Depot Capability) आणि इतर संबंधित लॉजिस्टिक सपोर्टचा समावेश असेल. युनायटेड किंगडम (UK) मधील कुम्ब्रिया येथील बीएई सिस्टम्स (BAE Systems) ही कंपनी या प्रकल्पाची मुख्य कंत्राटदार असणार आहे.

डोंगराळ भागातील संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या तोफा:

भारताने २०१७ मध्ये अमेरिकेसोबत एका आंतर-शासकीय करारांतर्गत (Foreign Military Sales) ५४२ दशलक्ष डॉलर्स खर्च करून १४५ नगांची ‘M777’ लाइटवेट तोफांची खरेदी केली होती. १५५ मिमीची ही तोफ वजनाने अतिशय हलकी असून ती जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने सहज वाहून नेली जाऊ शकते. विशेषतः भारत आणि चीनच्या सीमेवरील दुर्गम, डोंगराळ व उच्च उंचीच्या (High-Altitude) भागात भारतीय लष्कराच्या संरक्षणाची आणि आक्रमकतेची धार वाढवण्यासाठी या तोफा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या नव्या करारामुळे या तोफांची युद्धसज्जता दीर्घकाळासाठी कायम राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *