महायुतीत ठिणगी! ‘७ दिवसांत अर्थखातं देणार होते, २ महिने झाले तरी निर्णय नाही’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची नाराजी

मुंबई (pragatbharat.com) : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपून दोन महिने उलटून गेले तरी अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला देण्यात आलेले नाही, यावरून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये महायुतीतील जागावाटप, खांदेपालट आणि अंतर्गत नाराजीचे जाहीर प्रदर्शन झाल्याचे समजते.

अजित पवारांच्या पश्चात अर्थखात्याचा तिढा: पूर्वी हे अर्थखातं अजित पवार यांच्याकडे होते, परंतु त्यांच्या अपघाती निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प तोंडावर असल्याने हे खातं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे घेतले होते. अजित पवारांकडे असलेले राज्य उत्पादन शुल्क (Excise) खातं सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आले, तर अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांत अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीला दिले जाईल, असे आश्वासन भाजपकडून देण्यात आले होते. मात्र, सातत्याने विचारणा करूनही मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय न घेतल्याने सुनेत्रा पवारांनी आमदारांच्या बैठकीत आपली खंत बोलून दाखविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

कुंभमेळ्याच्या २५ हजार कोटींच्या कामांवरून कोकाटे आक्रमक: याच बैठकीत नाशिकमधील कुंभमेळ्याच्या कामांवरून माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. नाशिकमध्ये कुंभमेळ्याची तब्बल २५ हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत, मात्र त्यापैकी एकही काम राष्ट्रवादीच्या आमदारांना किंवा कार्यकर्त्यांना देण्यात आलेले नाही, असा थेट आरोप कोकाटे यांनी केल्याने बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते.

सुनील तटकरेंचा संताप, प्रफुल पटेलांची दांडी: दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादही या बैठकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी बैठकीत सर्वांनाच खडे बोल सुनावले. “माझ्यावर आणि प्रफुल पटेल यांच्यावर सातत्याने बाहेरून टीका होत असताना पक्षातील कोणीही आमच्या बाजूने ठामपणे उभे राहत नाही. आम्हीच नेहमी टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व यावर काही भूमिका घेणार आहे की नाही?” असा संतप्त सवाल तटकरेंनी उपस्थित केला. विशेष म्हणजे, मुंबईत असूनही प्रफुल पटेल यांनी या बैठकीला दांडी मारल्याने पक्षात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *