महायुतीत राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक; अर्जुन खोतकर सुनेत्रा पवारांच्या भेटीला, मुलाला तिकीट मिळणार?

मुंबई (pragatbharat.com) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीतील जागावाटपावरून महायुतीत तणाव निर्माण झाला असतानाच, मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. जळगावच्या जागेनंतर आता इतर ठिकाणीही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील शिंदे सेनेचे खंदे शिलेदार अर्जुन खोतकर यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ‘देवगिरी’ बंगल्यावर भेट घेतली, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आज सायंकाळी ‘वर्षा’ निवासस्थानी महायुतीची तातडीची बैठक बोलावली आहे.

मुलाच्या उमेदवारीसाठी अर्जुन खोतकर आग्रही: अर्जुन खोतकर हे आधी त्यांच्या मुलीसाठी आग्रही असल्याची चर्चा होती, मात्र सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर त्यांनी स्वतः स्पष्ट केले की, त्यांची मुलगी नाही तर मुलगा अभिमन्यू खोतकर विधान परिषदेसाठी इच्छुक आहे. अभिमन्यू याला तिकीट देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे घेतील, असे सांगत त्यांनी मुलाच्या उमेदवारीसाठी मागणी केल्याचे मान्य केले. मात्र, सुनेत्रा पवार यांच्याकडे केवळ कामाच्या निमित्ताने भेट घेतल्याचे सांगत त्यांनी उमेदवारीसाठी कोणताही पाठिंबा मागितला नसल्याचे स्पष्ट केले. छत्रपती संभाजीनगरनंतर आता मराठवाड्यातील अजून एका जागेसाठी शिंदे सेना आग्रही असल्याचे यावरून दिसत आहे.

‘वर्षा’वर रंगणार जागावाटपाचा अंतिम निर्णय: पुण्याच्या जागेवरून भाजप-राष्ट्रवादी, तर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरवरून शिवसेना-भाजपमध्ये धुसफूस सुरू आहे. हा वाद मिटवण्यासाठी आज सायंकाळी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. आज दिवसभर मुंबईत जोरदार राजकीय हालचाली होणार असून, या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटून अंतिम शिक्कामोर्तब होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *