मुंबईतील ताज आणि ट्रायडेंट हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; नवी मुंबईतून एकाला अटक, पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई (pragatbharat.com) : दक्षिण मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित आणि आलिशान ताज महल पॅलेसट्रायडेंट या दोन हॉटेलना मंगळवारी रात्री धमकीचा फोन आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत नवी मुंबईतील पनवेल परिसरातून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

धमकीचा फोन आणि पोलिसांची कारवाई: मंगळवारी रात्री ९:३० च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने फोन करून या दोन्ही हॉटेलवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. या माहितीनंतर कुलाबा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे फोन करणाऱ्याचा शोध सुरू केला. संशयित व्यक्ती नवी मुंबईतील असल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलिसांनी पनवेलमधील विचुंबे गावातून त्याला ताब्यात घेतले.

संशयिताची ओळख: अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव संतोष सुभराव सावंत (४२) असे असून तो मूळचा न्यू पनवेल येथील रहिवासी आहे. तो हाऊसकीपिंग क्षेत्रात काम करतो. पोलिसांनी त्याला कुलाबा पोलीस ठाण्यात आणले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. त्याने हा फोन का केला आणि त्यामागे काही मोठा कट आहे का, याचा तपास पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

सुरक्षेत मोठी वाढ: धमकीचा फोन आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही हॉटेल आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली होती. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने (BDDS) परिसराची तपासणी केली, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सध्या कुलाबा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *