सावधान! डेटिंग ॲपवरून भेटणे पडले महागात; वांद्रे येथे तरुणाला मारहाण करून लुटले, दोन आरोपींना अटक

Mohammad Rizwan Mohammad Imran Sheikh, 19, Dongri

Mohammad Ali Mohammad Shafiq Qureshi, 22, Behrampada, Bandra East

मुंबई (pragatbharat.com) : डेटिंग ॲपच्या माध्यमातून ओळखीचे रुपांतर प्रत्यक्ष भेटीत करणे मुंबईतील एका २० वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. वांद्रे येथे भेटायला गेलेल्या या तरुणाला दोन व्यक्तींनी तब्बल दोन तास शहरात फिरवून मारहाण केली आणि त्याच्याकडून १८,००० रुपये जबरदस्तीने ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाची ‘Walla’ नावाच्या डेटिंग ॲपवर मोहम्मद रिझवान याच्याशी ओळख झाली होती. ५ मे रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास त्यांनी वांद्रे तलाव येथे भेटण्याचे ठरवले. रिझवान तिथे स्कुटर घेऊन आला आणि त्याने पीडिताला कार्टर रोडच्या दिशेने नेले. वाटेत त्याचा दुसरा साथीदार मोहम्मद अली हा देखील त्यांच्यासोबत सामील झाला.

असा केला अत्याचार आणि लूट: कार्टर रोड जवळील एका निर्जन ठिकाणी आरोपींनी आपला खरा चेहरा दाखवला. त्यांनी पीडित तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर त्याला PhonePe चा पासवर्ड सांगण्यासाठी भाग पाडले. आरोपींनी त्याला डॉकयार्ड रोड परिसरात नेले आणि तिथल्या एका मोबाईल शॉपच्या QR कोडवर १८,००० रुपये ट्रान्सफर केले. पैसे मिळाल्यावर आरोपींनी त्याला मोबाईल परत केला आणि तिथून पळ काढला.

स्कुटरच्या नंबरमुळे आरोपी गजाआड: पीडित तरुणाने प्रसंगावधान राखत आरोपींच्या स्कुटरचा नंबर (MH-02-GM-1363) लिहून घेतला होता. वांद्रे पोलिसांनी या नंबरच्या आधारे आणि CCTV फुटेजच्या मदतीने अवघ्या तीन तासांत दोन्ही आरोपींना जुहू चौपाटीवरून अटक केली. मोहम्मद रिझवान (१९) आणि मोहम्मद अली (२२) अशी या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. डेटिंग ॲप वापरणाऱ्यांनी अनोळखी व्यक्तींना भेटताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *