मुंबईत हॉटेल, बेकरी चालकांना लुटणारा तोतया ‘FSSAI’ अधिकारी नागरिकांच्या जाळ्यात; मालवणी पोलिसांच्या स्वाधीन

मुंबई (pragatbharat.com) : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाचा (FSSAI) बनावट अधिकारी बनून हॉटेल, बेकरी आणि इतर खाद्यपदार्थांच्या दुकानांमधून खंडणी उकळणाऱ्या एका तोतया अधिकाऱ्याला मुंबईतील मालवणी परिसरात नागरिकांनी रंगेहात पकडले आहे. नागरिकांनी या तोतया अधिकाऱ्याला चांगलाच इभ्रत शिकवत ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी मालवणी पोलिसांच्या स्वाधीन केले.

कारवाईची धमकी देऊन २५ हजारांची वसुली स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मालवणी येथील कच्चा रस्ता परिसरातील एका बेकरी चालकाला गाठले होते. आपण ‘FSSAI’ चे मोठे अधिकारी असल्याचे सांगत त्याने बेकरीच्या परवान्याची आणि खाद्यपदार्थांच्या दर्जाची तपासणी करण्याचे नाटक केले. नियमांचे उल्लंघन केल्याचा बनाव रचत आणि बेकरीवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देऊन त्याने बेकरी मालकाकडून २५,००० रुपये उकळले.

नागरिकांच्या सतर्कतेमुळे तोतयाचे बंड फसले आरोपीच्या संशयास्पद हालचाली आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे आजूबाजूच्या लोकांना आणि दुकानदारांना त्याचा संशय आला. स्थानिक नागरिकांनी एकत्र येत त्याला अडवले आणि त्याची ओळखपत्रे (ID Card) तसेच अधिकृत कागदपत्रांची मागणी केली. नागरिकांनी कसून चौकशी सुरू करताच आरोपीची भंबेरी उडाली. त्याने आपले कृत्य मान्य करत नागरिकांसमोर माफी मागण्यास सुरुवात केली आणि हे प्रकरण आपापसात मिटवण्यासाठी गयावया करू लागला.

मात्र, नागरिकांनी त्याचे काहीही न ऐकता त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. मालवणी पोलीस ठाण्यात आरोपीला आणण्यात आले असून, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या तोतया अधिकाऱ्याने मुंबईत आणखी किती हॉटेल्स आणि बेकरी चालकांना अशा प्रकारे गंडा घातला आहे, याचा तपास आता मालवणी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *