मुंबई लोकलमध्ये काळजाचा थरकाप! मुसळधार पावसात दरवाजा बंद करण्यावरून वाद, २२ वर्षीय तरुणाच्या पोटात सपासप वार

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुसळधार पावसात लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून एका २२ वर्षीय तरुणावर धावत्या लोकलमध्ये चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. चर्चगेट ते नालासोपारा दरम्यान धावणाऱ्या जलद (Fast Local) लोकल ट्रेनमध्ये अंधेरी आणि बोरिवली स्थानकादरम्यान रात्रीच्या सुमारास हा थरार घडला. या हल्ल्यात मयंक लोहार (वय २२) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या पोटात धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत.

मुसळधार पाऊस आणि दरवाजा बंद करण्यावरून पेटला वाद पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुण मयंक लोहार हा सोमवारी रात्री १०.०५ वाजता चर्चगेटवरून सुटलेल्या नालासोपारा जलद लोकलच्या (ट्रेन क्र. ९०६६३) प्रथम श्रेणी (First-Class) डब्यातून प्रवास करत होता. रात्री १०.४२ च्या सुमारास ट्रेन अंधेरी स्थानकात पोहोचली. यावेळी बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. डब्यात शिरलेले पाणी आणि पावसाचे तुषार रोखण्यासाठी लोकलचा दरवाजा बंद करावा की उघडा ठेवावा, यावरून मयंक आणि दुसऱ्या एका अज्ञात सहप्रवाशामध्ये जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या अज्ञात नराधम आरोपीने रागाच्या भरात थेट धारदार शस्त्र उपसले आणि मयंकच्या पोटात सपासप वार केले. मयंक रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच, ट्रेन बोरिवली स्थानकात पूर्ण थांबण्यापूर्वीच आरोपीने चालत्या लोकलधून उडी मारून पळ काढला.

रेल्वे प्रशासनाची तत्परता; ३ मिनिटांत पोहोचली टीम रक्ताने माखलेल्या अवस्थेत ही लोकल रात्री ११.०४ वाजता बोरिवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर पोहोचली. घटनेची माहिती मिळताच पश्चिम रेल्वेचे रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि लोहमार्ग पोलीस (GRP) अवघ्या ३ मिनिटांत डब्यापाशी पोहोचले. ११.१० वाजता स्ट्रेचर आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. ११.१२ वाजता मयंकला डब्यातून बाहेर काढून बोरिवली स्थानकातील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात (EMR) नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रात्री ११.४२ वाजता रुग्णवाहिकेने मयंकला कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital) हलवण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी; CCTV फुटेज पोलिसांच्या ताब्यात या गंभीर घटनेची दखल घेत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळाचा आढावा घेतला. अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (मुंबई सेंट्रल) आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांनी रात्री १ वाजता बोरिवली स्थानकाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) विनीत अभिषेक यांनी सांगितले की, रेल्वेने तातडीने आणीबाणीच्या उपाययोजना राबवून जखमी प्रवाशाला मदत केली आहे. रेल्वे डब्यातील आणि स्थानकावरील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज सुरक्षित करण्यात आले असून ते तपास यंत्रणांकडे सोपवण्यात आले आहेत. बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *