मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तातडीच्या बैठकीनंतर वारं फिरलं; अब्दुल सत्तारांचे सूर बदलले, महायुतीमधील बंडखोरी शमणार?

ठाणे/छत्रपती संभाजीनगर (pragatbharat.com) : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये निर्माण झालेली नाराजी अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर निवळण्याची चिन्हे आहेत. विधान परिषदेच्या १७ जागांपैकी शिवसेनेच्या (शिंदे गट) वाट्याला अवघ्या ४ जागा आल्याने पक्षात अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. विशेषतः शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपकडे गेल्याने आणि तेथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता.

ठाण्यातील महापौर निवासस्थानी साडेतीन तास खलबत्ते: या राजकीय पेचावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री ठाण्यातील महापौर निवासस्थानी छत्रपती संभाजीनगरमधील पक्षाच्या प्रमुख आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला नवनिर्वाचित खासदार सांदिपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत संभाजीनगरमधील बंडखोरी आणि आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली.

नेत्यांचा आदेश अंतिम, युतीला तडा जाऊ देणार नाही – अब्दुल सत्तार: बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांचे सूर पूर्णपणे बदललेले पाहायला मिळाले. “एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत आणि ते जो निर्णय देतील तो आमच्यासाठी अंतिम असेल. राज्यातील महायुतीला तडा जाणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ. उद्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल,” असे सत्तार यांनी स्पष्ट केले.

४ जूनपर्यंत सर्व जागांवर चित्र स्पष्ट होणार – मुख्यमंत्री: बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुती भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला. “विधान परिषदेच्या १७ च्या १७ जागांवर महायुतीकडे पूर्ण बहुमत (Number Majority) आहे. अब्दुल सत्तार हे महायुतीचे नियम पाळतील आणि ४ जूनच्या अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित होतील,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या या यशस्वी शिष्टाईमुळे भाजप आणि महायुतीसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *