
पुणे (pragatbharat.com): पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरासाठी महत्त्वाची ठरणारी घोषणा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने केली आहे. मोशी येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) नागपूरच्या विस्तारित शैक्षणिक व प्रशिक्षण कॅम्पससाठी सुमारे २८ हेक्टर शासकीय जमीन विनामूल्य उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या नव्या कॅम्पसमुळे व्यवस्थापन शिक्षण, संशोधन, उद्योगांसोबतचे सहकार्य आणि कौशल्य विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मोशी परिसराची पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबईशी असलेली उत्कृष्ट संपर्क व्यवस्था तसेच औद्योगिक आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील वाढ लक्षात घेऊन या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे.
या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना उद्योगांशी प्रत्यक्ष जोडणाऱ्या संधी उपलब्ध होतील. तसेच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती, शैक्षणिक सुविधा आणि परिसराच्या सर्वांगीण विकासालाही गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

