
किव्ह/मॉस्को (pragatbharat.com) : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष पुन्हा एकदा विकोपाला गेला आहे. गेल्या २४ तासांत रशियाने केलेल्या भीषण ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १० नागरिकांचा मृत्यू झाला असून किमान ७६ जण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या पाच महत्त्वाच्या प्रांतांमध्ये रशियाने हे हवाई हल्ले केले असून, नागरी वस्त्यांना मोठे नुकसान पोहोचले आहे.
युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खेरसन प्रांतात तीन, तर ओडेसा, डोनेत्स्क आणि झापोरीझिया प्रांतात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सुमी प्रांतातही एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. रशियाकडून युक्रेनच्या शहरांवर नियमितपणे होणाऱ्या हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे.
युक्रेनचा रशियावर पलटवार: दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी मोठी कारवाई केल्याचा दावा केला आहे. रशियाच्या वायव्य भागातील एका ऑईल टर्मिनलचे मोठे नुकसान करण्यात आले असून, काळ्या समुद्रातील नोवोरोसिस्क बंदराजवळ रशियाची दोन तेलवाहू जहाजे (Oil Tankers) ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त झाली आहेत. ही जहाजे रशियाच्या ‘शॅडो फ्लीट’चा भाग होती, ज्याचा वापर पाश्चात्य निर्बंध टाळून तेल विक्रीसाठी केला जातो.
रशियानेही युक्रेनवर मोठा आरोप केला असून, युक्रेनने रशियन भूभागावर तब्बल ३३४ ड्रोन डागल्याचे म्हटले आहे. रशियाच्या लेनिनग्राड प्रांताला युक्रेनने लक्ष्य केले असून, रशियन सीमेच्या आतपर्यंत पोहोचणाऱ्या युक्रेनियन ड्रोन्समुळे क्रेमलिनची चिंता वाढली आहे.

