
नवी दिल्ली (pragatbharat.com) : कैलास मानसरूवर यात्रेसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपुलेख खिंडीवर (Lipulekh Pass) नेपाळने घेतलेला आक्षेप भारताने पूर्णपणे फेटाळून लावला आहे. नेपाळचा हा दावा समर्थनीय नसून ऐतिहासिक तथ्यांवर आधारित नाही, अशा कडक शब्दांत भारताने आपले मत मांडले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियाद्वारे भारताची भूमिका स्पष्ट केली.
जयस्वाल यांनी नमूद केले की, १९५४ पासून लिपुलेख खिंड हा कैलास मानसरूवर यात्रेसाठीचा एक प्रदीर्घ काळ वापरला जाणारा मार्ग आहे. हा काही नवा विकास नाही, तर अनेक दशकांपासून या मार्गावरून यात्रा सुरू आहे. या संदर्भात भारताची भूमिका नेहमीच स्पष्ट आणि सुसंगत राहिली आहे. प्रादेशिक दाव्यांचा असा एकतर्फी आणि कृत्रिम विस्तार करणे अस्वीकार्य असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.
नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने अलीकडेच या वार्षिक यात्रेच्या संदर्भात सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना भारताने स्पष्ट केले की, सीमावादासारखे प्रलंबित प्रश्न संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवण्यासाठी भारत नेहमीच सकारात्मक आहे. मात्र, ऐतिहासिक पुराव्यांना डावलून केलेले दावे अवास्तव आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी विधायक चर्चेची तयारी भारताने दर्शवली आहे.

