
जळगाव (pragatbharat.com) : “राज्यात चिमुकल्या मुली आणि महिलांना न्याय देता येत नसेल, तर राजकारणात येऊन कुठेतरी फसलो किंवा चुकलो असे वाटते,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते आमदार रोहित पवार यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, भडगाव येथील तीन वर्षांपूर्वीच्या एका अत्याचार पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यावर ते बोलत होते.
फास्टट्रॅक कोर्टाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह: भडगावच्या गोंडगावमध्ये २०२३ साली एका ७ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेला तीन वर्षे उलटूनही अद्याप न्याय मिळालेला नाही. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, “राज्यात फास्टट्रॅक कोर्टाची फक्त चर्चा होते, पण प्रत्यक्षात त्याचा फायदा गरिबांना मिळताना दिसत नाही. आजही त्या कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा करावी लागतेय, हे दुर्दैवी आहे.”
शक्ती कायदा लागू करण्याची मागणी: राज्यातील महिला सुरक्षेच्या भीषण परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी धक्कादायक आकडेवारी मांडली. “महाराष्ट्रात दिवसाला सरासरी २४ बलात्कार होत असून वर्षाला १३ हजार लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरलेली नाही,” असा आरोप त्यांनी केला. सरकारने २०१९ मध्ये आणलेला ‘शक्ती कायदा’ तातडीने आणि अधिक कडक करून लागू करावा, जेणेकरून नराधमांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
गृह विभाग आणि सिस्टीमवर टीका: रोहित पवारांनी गृह विभागाच्या कामावरही ताशेरे ओढले. एका मंत्र्याच्या OSD ने पत्नीला मारहाण केल्याच्या घटनेचा उल्लेख करत ते म्हणाले की, जर सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या लोकांनाच कायद्याचा धाक नसेल, तर सामान्य महिलांचे काय? गृह विभाग आणि सरकारी यंत्रणा महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रकरणी राजकारण बाजूला ठेवून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी सरकारला केली आहे.

