
ठाणे (pragatbharat.com) : राज्यसभेपाठोपाठ आता आगामी विधान परिषद निवडणुकीतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘धक्कातंत्र’ वापरले जाण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांसाठी विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून, यात ठाणे मतदारसंघातील उमेदवारीवरून सत्ताधारी महायुतीत मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे विद्यमान नेते रवींद्र फाटक यांचा पत्ता कट करून, बहुजन विकास आघाडीचे (बविआ) क्षितीज ठाकूर यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेची मतांच्या गोळाबेरिजेसाठी नवी खेळी: ठाणे विधान परिषद जागेवर पकड मजबूत करण्यासाठी आणि मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी शिवसेनेकडून ही मोठी राजकीय खेळी खेळली जात असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे. या बदल्यात क्षितीज ठाकूर यांची ठाण्यातून महायुतीचे उमेदवार म्हणून एन्ट्री होऊ शकते. या धक्कातंत्राच्या चर्चेपूर्वी रवींद्र फाटक यांनी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या, मात्र आता त्यांचे तिकीट कापले जाण्याची चिन्हे आहेत.
निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम आणि जागांचा इतिहास: गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याने विधान परिषदेच्या या जागा रिक्त होत्या. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार २५ मे रोजी अधिसूचना जारी झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ जून २०२६ आहे. २ जून रोजी अर्जांची छाननी होईल, तर ४ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येतील. या १७ जागांसाठी १८ जून रोजी मतदान आणि २२ जून २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. ठाणे, पुणे, नाशिक, सोलापूर आणि अहिल्यानगरसह राज्यातील प्रमुख १७ मतदारसंघांत ही चुरस पाहायला मिळणार आहे.


