
पालघर (pragatbharat.com) : पालघर जिल्ह्यातील विरार परिसरातून एक अतिशय खळबळजनक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून एका माथेफिरू तरुणाने आपल्या प्रेयसीसह तिच्या आईची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. विरार पश्चिम येथील न्यू वीवा कॉलेजजवळ असलेल्या पूनम आकांक्षा इमारतीत दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास हे भीषण हत्याकांड घडले. या घटनेमुळे संपूर्ण पालघर जिल्ह्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, शिवम उपाध्याय नावाच्या तरुणाचे नैंसी मिश्रा (वय २४) हिच्यावर प्रेम होते. शिवमने नैंसीकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला होता, मात्र नैंसी आणि तिच्या कुटुंबीयांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला. याचाच राग मनात धरून शिवम शनिवारी दुपारी नैंसीच्या घरी पोहोचला. तिथे पुन्हा एकदा वाद झाला आणि रागाच्या भरात शिवमने आपल्यासोबत आणलेल्या तीक्ष्ण चाकूने नैंसीवर वार करण्यास सुरुवात केली. मुलीला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तिची आई सरिता मिश्रा (वय ४५) यांच्यावरही शिवमने सपासप वार केले.
माय-लेकीचा जागीच मृत्यू हल्ला इतका भीषण होता की, नैंसी आणि सरिता या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी शिवमने स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा ऐकून धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.
विरार पोलिसांकडून तपास सुरू घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, जखमी आरोपीला ताब्यात घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दिवसाढवळ्या भरवस्तीत आणि इमारतीमध्ये घुसून झालेल्या या हत्येमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शिवमने हा कट आधीच रचला होता का, याचाही शोध घेतला जात आहे.

